दूध संकलन व गुणवत्तावाढीसाठी समन्वयातून काम करण्याची गरज : प्रदीप मालगावे
schedule06 Jun 26 person by visibility 133 categoryउद्योग
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) च्या संकलन विभागाची आढावा बैठक ताराबाई पार्क येथील कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत दूध संकलनाची सद्यस्थिती, गुणवत्तापूर्ण दूध संकलन, दुय्यम प्रतीच्या दुधाचे प्रमाण कमी करणे, खाजगी व गवळी दूध विक्रीला आळा घालणे तसेच दूध उत्पादकांशी अधिक प्रभावी संवाद साधून संकलन वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी प्रशासकीय सदस्य प्रदीप मालगावे यांनी दूध संकलन वाढ आणि गुणवत्तावाढ ही गोकुळच्या प्रगतीची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे सांगितले. बदलत्या हवामानाचा दूध उत्पादनावर परिणाम होत असला तरी अधिकारी, कर्मचारी, सुपरवायझर आणि दूध उत्पादक यांनी समन्वयाने काम केल्यास संकलन वाढीस निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दूध उत्पादकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे वेळेत निराकरण करणे तसेच सातत्यपूर्ण संपर्क ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बैठकीत प्रशासकीय सदस्य प्रदीप मालगावे व सागर बलकवडे यांनी रूटनिहाय दूध संकलन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. संकलन विभागातील त्रुटी दूर करण्यासाठी ठोस व परिणामकारक उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. काही दूध संस्था संकलित दूध अंशतः गोकुळकडे तर अंशतः इतर दूध संघ अथवा खासगी संस्थांकडे पाठवत असल्याचे निदर्शनास आल्याने अशा संस्थांना प्रथम सूचना देण्यात येणार असून आवश्यकतेनुसार सर्व सेवा सुविधा बंद करण्यासंबंधी संघ नियमांनुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. दूध उत्पादकांनी भारत पशुधन ॲपमध्ये जनावरांची नोंदणी अद्ययावत ठेवावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यामुळे योजनांचा लाभ वेळेत मिळून दूध उत्पादन नियोजन अधिक प्रभावी होणार असल्याचे सांगण्यात आले.
तसेच दूध वाहतूक ठेकेदारांबाबत तक्रारी आल्यास गंभीर दखल घेतली जाणार असून अनियमितता आढळल्यास नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र शिस्तबद्ध कारवाई नियमावली तयार करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला.
गोकुळशी संलग्न सर्व संस्थांनी संकलित केलेले संपूर्ण दूध गोकुळलाच पाठविण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी सुपरवायझरांनी सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. संस्थास्तरावर सातत्याने मार्गदर्शन करणे, दूध उत्पादकांना संघाच्या विविध योजना व सेवा-सुविधांची माहिती प्रभावीपणे पोहोचविणे आणि उत्पादकांशी संवाद अधिक मजबूत करणे यावर विशेष चर्चा करण्यात आली.
प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रिक यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संकलन वाढ व गुणवत्तावाढ कार्यक्रम राबविण्यात येत असून संकलन विभागातील सुपरवायझर यांनी त्यांच्यावर सोपविलेल्या संघ कामकाजातील जबाबदाऱ्या शिस्तबद्ध, काटेकोर व वेळेत पार पाडाव्यात, असे निर्देश देण्यात आले. सर्व संबंधित घटकांनी समन्वयाने काम करून संघाच्या प्रगतीला अधिक गती द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या बैठकीचे स्वागत व प्रास्ताविक संकलन सहा. व्यवस्थापक धनाजी पाटील यांनी केले तर आभार वरिष्ठ दूध संकलन अधिकारी संभाजी पाटील यांनी मानले. या बैठकीस प्रशासकीय मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे, संघाचे संकलन विभाचे अधिकारी, सुपरवायझर, कर्मचारी उपस्थित होते.