कडोलीत अवैध गुटख्यावर 'सर्जिकल स्ट्राईक'!
schedule27 Mar 26 person by visibility 111 categoryराज्य
कोल्हापूर : कडोली (ता. पन्हाळा) येथे प्रतिबंधित गुटखा व सुगंधी पान मसाला अवैध साठवणूक व घाऊक विक्री होत असल्याबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सिव्हील सर्जन कार्यालय कोल्हापूर,अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईत जिल्हा सल्लागार (NTCP) डॉ. व्ही. ए. आरळेकर, अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी (FSO) विजय पाचपुते तसेच कडोली पोलीस स्टेशनचे अधिकारी आर. ए. पाटील व ग्उपजिल्हा रुग्णालय कडोली च्या दंतचिकित्सक डॉ भूमिका फतेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कडोली बस स्थानक, उपजिल्हा रुग्णालय व परिसरातील विविध ठिकाणी तपासणी केली.
सदर मोहिमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, साठवणूक व वापर आढळून आल्याने एकूण १३ जणांवर सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध व व्यापार नियमन) अधिनियम २००३ (COTPA Act 2003) अंतर्गत कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण ₹२,६००/- इतका दंड वसूल करण्यात आला.
कारवाईदरम्यान संबंधितांना तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्य धोक्यांबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन व विक्रीबाबत कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
“तंबाखूमुक्त समाज निर्माण करण्यासाठी अशा संयुक्त धडक मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असून, नागरिकांनीही कायद्याचे पालन करून व्यसन,तंबाखू मुक्त समाज करणे कामी प्रशासनाला सहकार्य करावे.” -डॉ व्ही ए आरळेकर (जिल्हा सल्लागार (एनटीसीपी) जिल्हा सिव्हिल सर्जन कार्यालय कोल्हापूर)
सदर कारवाईमुळे परिसरातील प्रतिबंधित गुटखा, सुगंधी पान मसाला अवैध साठवणूक व घाऊक
विक्रीवर प्रभावी आळा बसण्यास मदत होणार असून, भविष्यातही अशा प्रकारच्या मोहिमा अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार आहेत.
सदर धडक कारवाई मोहिमी कामी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रशांत वाडीकर, अन्न व औषध प्रशासन चे श्री शिर्के आणि कडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कोडग यांचे सहकार्य लाभले.