🟣 एकाच कंपनीत, एका वेळी सर्वाधिक विद्यार्थ्यांची निवड होणारे पश्चिम महाराष्ट्रातील महाविद्यालय
कोल्हापूर : यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होते ना होते तोच कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉंलॉजीच्या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल २२१ विद्यार्थ्यांनी एकाच कंपनीत सर्वाधिक प्लेसमेंट होण्याचा बहुमान मिळवत डीएक्ससी टेक्नॉंलॉजी कंपनीत प्रत्येकी वार्षिक ४.५ लाखांचे पॅकेज मिळवल्याची माहिती केआयटी चेअरमन सुनील कुलकर्णी व कार्यकारी संचालक डॉ. विलास कार्जींन्नी यांनी दिली.
पश्चिम महाराष्ट्रातील एकाच कंपनीत, एका वेळी निवड होण्याची ही सर्वाधिक संख्या असल्याने ही बाब, कोल्हापूर केआयटीसाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा केआयटीच्यावतीने आज भव्य सत्कार करण्यात आला.
जगभर कार्यक्षेत्र असलेल्या सॉफ्टवेअर क्षेत्रातील नामांकित कंपनी डिएक्ससी टेक्नोलॉजीच्या वतीने गेले आठवडाभर चालू असलेल्या या निवड प्रक्रियेमध्ये लेखी चाचणी, टेक्निकल लेखी, टेक्निकल मुलाखत आणि एच आर मुलाखत असे चार टप्पे पार केल्यानंतर संबधित विद्यार्थ्यांना त्यांची निवडपत्रे देण्यात आली. यामध्ये बायोटेक्नॉलॉजीच्या ०४, इलेक्ट्रिकल १५, ई अँड टीसी ६३, मेकॅनिकल ३८, सिव्हिल ९, सिव्हील व इन्व्हायरमेन्ट १, कम्प्युटर सायन्सच्या ९१ आशा एकूण २२१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या विद्यार्थ्यांची चाचणी सुरू होण्याआधी केआयटीच्या वतीने तांत्रिक, बौध्दिक आणि मॉक इंटरव्ह्यूची विविध प्रात्यक्षिक सत्रे आयोजित करण्यात आली होती. त्याचा फायदा झाला व विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनचा फायदा घेऊन अनेक ऑनलाईन सेशनमध्ये भाग घेतला.
या विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, कार्यकारी संचालक डॉ. विलास कार्जींन्नी, सल्लागार डॉ. मोहन वणरोट्टी, ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी डॉ. अमित सरकार, यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, ट्रेंनिग व प्लेसमेंटचे विभाग समन्वयक, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.