तेरवाड येथील आरोग्य शिबिरात २४६ नागरिकांची तपासणी
schedule28 Oct 26 person by visibility 171 categoryआरोग्य
◼️आरोग्य अभियानातील लाभार्थ्यांची संख्या ११ हजार ७४६ वर
तेरवाड : सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरोळ तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या मोफत आरोग्य व नेत्र तपासणी अभियानांतर्गत तेरवाड येथे आयोजित आरोग्य शिबिरात २४६ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरानंतर अभियानातील आजअखेर लाभार्थ्यांची संख्या ११ हजार ७४६ वर पोहोचली आहे.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, विविध आजारांचे वेळेत निदान करणे आणि आरोग्याविषयी जनजागृती करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
शिरोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये या अभियानांतर्गत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जात असून, नागरिकांना मोफत आरोग्य व नेत्र तपासणीचा लाभ मिळत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे अभियान उपयुक्त ठरत आहे.
तेरवाड येथील शिबिरप्रसंगी शाबगोंडा पाटील, दत्तगोंडा पाटील, जगन्नाथ पुजारी, सूरज कांबळे, आप्पा पाटील, संग्राम जगताप, विक्रम माने गुंडू, संजय कोळी, सुहास कांबळे, युवराज पाटील, श्रीशैल्य मठपती, आमगोंडा पाटील, विनायक पुजारी, अरुण भंडारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.