डी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदेच्या २७१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड
schedule14 Aug 26 person by visibility 127 categoryशैक्षणिक
तळसंदे : तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या विविध शाखांमधील २७१ विद्यार्थ्यांची देशातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. यातील काही विद्यार्थ्यांना ९ लाखांपर्यंतचे पॅकेज मिळाले आहे.
या ७० हून अधिक नामांकित कंपन्यांनी घेतलेल्या कॅम्पस ड्राइव्हद्वारे हि निवड करण्यात आली. यामध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, डेटा सायन्स, फूड टेक्नॉलॉजी, कृषी अभियांत्रिकी, एमबीए, बीबीए, एमसीए, बीसीए, एमबीए -ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, एम.एस्सी. फूड आणि एम.एस्सी. केमिस्ट्री या शाखांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
विद्यापीठातील विद्यार्थ्यांना झायडेक्स, अडामा, इंडिया मार्ट, डीमार्ट, व्ही-ट्रान्स, के-१२ टेक्नो सर्व्हिसेस प्रा. लि., टाटा मोटर्स, टीसीएस, ऑप्टिमम डेटा ॲनालिटिक्स, व्ही-स्काय सोल्युशन्स, स्माईल ऑटोमेशन, गद्रे मरीन एक्सपोर्ट प्रा. लि., ओलन फार्मास्युटिकल्स, इन्फोयॅशन अँड टेक्नॉलॉजी, एफझेडई डिजिटायझ सोल्युशन्स, रिअल टाइम ॲप्लिकेशन सेंटर, कॉम्पसर्व्ह कन्सल्टंट्स प्रा. लि. यांसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत.
विद्यापीठामध्ये प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे सॉफ्ट स्किल्स, ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन स्किल्स, तांत्रिक प्रशिक्षण, मॉक इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन आणि उद्योगतज्ज्ञांचे मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून ते उद्योगक्षेत्रातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जात आहेत. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमध्ये चांगला फायदा झाल्याचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता यांनी सांगितले.
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. प्रदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी या निवडीसाठी विशेष मेहनत घेतली.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, प्र-कुलपती ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.