अवकाळीग्रस्त ३६८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३० लाख जमा
schedule13 Sep 26 person by visibility 16 categoryराज्य
◼️शेतकऱ्यांनी मानले आमदार यड्रावकर यांचे आभार
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. तालुक्यातील ३६८ शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण झाल्याने त्यांच्या खात्यावर सुमारे ३० लाख रुपयांची नुकसानभरपाई जमा होत आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे आभार मानले आहेत.
एप्रिलमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शिरोळ तालुक्यातील ९७१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई मिळावी, यासाठी आमदार यड्रावकर यांनी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नुकसानभरपाईची प्रक्रिया राबविण्यात आली.
तालुक्यातील ९७१ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी २३० शेतकऱ्यांना यापूर्वी २७ लाख ३७ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे. तर उर्वरित ७३१ शेतकऱ्यांना ६७ लाख १८ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित होते.
यापैकी ३६८ शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याने त्यांच्या खात्यावर आता सुमारे ३० लाख रुपयांची नुकसानभरपाई जमा होत आहे. मात्र, अद्याप ३६३ शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली नसल्याने त्यांना नुकसानभरपाईचा लाभ मिळालेला नाही. या शेतकऱ्यांसाठी सुमारे ३७ लाख ८१ हजार रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम प्रलंबित आहे.
त्यामुळे उर्वरित ३६३ शेतकऱ्यांनी तातडीने केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. केवायसी पूर्ण झाल्यानंतर संबंधित पात्र शेतकऱ्यांना प्रलंबित नुकसानभरपाईची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या एकाही पात्र शेतकऱ्याला मदतीपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही गतीने पूर्ण करावी, अशा सूचना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.