अनधिकृत नळ कनेक्शन व थकबाकीदारांवर महापालिकेची धडक कारवाई; शास्त्रीनगरमध्ये ६ कनेक्शन खंडित
schedule18 Aug 26 person by visibility 85 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभाग व उपद्रव शोध पथकामार्फत शहर व संलग्न ग्रामीण भागातील थकबाकीदार तसेच अनधिकृत नळ कनेक्शनधारकांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मोठ्या थकबाकीदारांवर तसेच अनधिकृत नळ कनेक्शनधारकांवर कनेक्शन खंडित करण्याची दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या संकल्पनेतून उपद्रव शोध पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागाची वसुली वाढविणे, पाणी चोरी, बेकायदेशीर नळ कनेक्शन तसेच मोटरीद्वारे होणारी पाणी चोरी शोधून त्यावर कारवाई करणे, हा या पथकाचा प्रमुख उद्देश आहे. या पथकामध्ये सेवानिवृत्त लष्करी जवानांचा समावेश असून, पथकामार्फत शहरात दररोज शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.
या विशेष मोहिमेअंतर्गत आज शास्त्रीनगर परिसरात मोठ्या थकबाकीदार नळ कनेक्शनधारकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी ३ अनधिकृत नळ कनेक्शन व ३ थकबाकीदारांची नळ कनेक्शन अशी एकूण ६ कनेक्शन खंडित करण्यात आली. तसेच थकबाकीपोटी १ लाख ९ हजार ३८७ रुपये वसूल करण्यात आले.
अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्या तसेच पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या नागरिकांनी आपली थकबाकी तातडीने भरून नळ कनेक्शन अधिकृत करून घ्यावे. अन्यथा महापालिकेमार्फत कोणतीही पूर्वसूचना न देता कनेक्शन खंडित करून नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
सदर कारवाई आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशाने तसेच अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर व जल अभियंता हर्षजीत घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये शाखा अभियंता सुनील भाईक, मीटर रीडर रमेश मगदूम, पथक कर्मचारी अरुण प्रभावळे, प्रवीण वरेकर, मुकुंद माने, प्रितेश रणवरे, भाग फिटर संभाजी रूईकर व वसंत गायकवाड यांनी सहभाग घेतला.