कोल्हापूर जिल्ह्यातील हळदी - कांडगाव मार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; १ ठार, ३० प्रवासी जखमी
schedule03 Feb 25 person by visibility 406 categoryगुन्हे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हळदी - कांडगाव मार्गावर तीव्र वळण घेत असताना खासगी बसचा रविवारी (दि. 2) मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. या बस अपघातात अमोल परशुराम भिसे (रा. छ. संभाजीनगर) हे ठार झाले तर, तीस प्रवासी जखमी झाल्याचे समजते.
ही खासगी बस गोव्यावरून छत्रपती संभाजीनगरला जात होती. मात्र, कोल्हापुरातून जात असताना हळदी - कांडगाव मार्गावर तीव्र वळणावरून जात असताना बसचा भीषण अपघात घडला आहे. या भीषण बस अपघातात एक ठार तर, ३० जण गंभीर असल्याची माहिती आहे.
जखमींवर सध्या कोल्हापूरमधील सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू आहे. हे प्रवासी छत्रपती संभाजीनगरच्या कंपनीतील कर्मचारी आहेत आणि हे सर्व प्रवासी गोव्याला सहलीसाठी गेले होते.
ही खासगी बस सायंकाळी ७ वाजता कणकवलीवरून सुटली. नंतर फोंडा घाटातून कोल्हापूर मार्गे ही बस निघाली होती. मात्र, कोल्हापुरात पोहोचल्यानंतर हळदी कांडगाव मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास बस उलटल्याने हा अपघात झाला.