गोकुळ अध्यक्ष निवड वाद: चंद्रकांतदादांच्या समर्थनार्थ भाजपा-महायुती आक्रमक; विरोधकांचा पत्रकार परिषदेतून जोरदार समाचार
schedule14 Nov 26 person by visibility 156 categoryउद्योग
कोल्हापूर : गोकुळ अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर विनाकारण होणाऱ्या वैयक्तिक टिकेला आणि ट्रोलिंगला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप जिल्हा कार्यालय, नागाळा पार्क येथे भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (महायुती) वतीने संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, शिवसेना नेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे नेते आदिल फरास, शिवसेनेचे नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, भाजप नेते महेश जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील तसेच महापौर रूपाराणी निकम उपस्थित होते.
महायुतीच्या नेत्यांनी आणि नगरसेवकांनी विरोधकांच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध करत चंद्रकांतदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले.
▪️पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे:
* नेत्यांच्या वादात लहान कार्यकर्त्यांची भरडणे चुकीचे:
मोठ्या नेत्यांमधील राजकीय वादात विनाकारण लहान कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पडून खालच्या पातळीवर टीका करणे अयोग्य आहे. ज्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात ४०-५० वर्षे तपस्या केली आहे, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणे खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम नेत्यांनी दिला.
* चंद्रकांतदादांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि कामावर ठाम विश्वास:
चंद्रकांतदादा हे कधीही सत्तेचा माज न बाळगणारे, तळागाळातून आणि संघर्षातून वर आलेले नेते आहेत. कोल्हापूरशी थेट संबंध नसतानाही त्यांनी सीपीआर रुग्णालयात हजारो गरिबांना मोफत जेवण फिरते दवाखाने, फिरते वाचनालय, बालसंस्कार वर्ग आणि अनेक सामाजिक उपक्रम अव्याहतपणे सुरू ठेवले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढवणाऱ्या आणि गड सर करणाऱ्या नेत्यावर वैयक्तिक टीका करणे चुकीचे असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
* विरोधकांच्या राजकारणाचा पर्दाफाश:
२००८ मधील स्थायी समिती सभापती निवडीचा संदर्भ आणि २०१३ मधील खंडोबा तालीम गणपती मिरवणुकीवेळचा पोलिस लाठीचार्ज व खोट्या गुन्ह्यांची आठवण करून देत, महाविकास आघाडीच्या काळात सत्तेचा खरा गैरवापर कुणी केला, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. गोकुळाची निवडणूक ही गोकुळच्या पातळीवर ठेवली पाहिजे, तिला महापालिकेच्या किंवा वैयक्तिक राजकारणात ओढणे दुर्दैवी आहे.
* आक्रमक इशारा:
आम्ही नेहमी शांत राहून विकासाचे राजकारण करतो, याचा अर्थ आम्हाला प्रत्युत्तर देता येत नाही असा नाही. भविष्यात चंद्रकांतदादांच्या विरोधात किंवा नेत्यांच्या विरोधात अशीच भाषा वापरल्यास महायुतीकडून अगदी ताकदीने आणि जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी भाजपचे सर्व नगरसेवक , पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते