सोशल मीडियावरील माहितीवर विश्वास ठेवताना सावध रहा : डॉ. शिवाजीराव जाधव
schedule26 Dec 25 person by visibility 49 categoryराज्य
▪️शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागातील मीडिया लेखन कार्यशाळेचा समारोप
कोल्हापूर : भारतीय पत्रकारितेची वाटचाल ही संघर्ष, सामाजिक जाणीव आणि निर्भीड विचारांवर आधारित राहिली आहे. देशातील प्रारंभीच्या वर्तमानपत्रांनी आर्थिक अडचणी, सामाजिक दबावांचा सामना करत पत्रकारितेचा पाया भक्कम केला. महाराष्ट्रातील मराठी पत्रकारितेनेही अशाच कठीण परिस्थितीत आपली ओळख निर्माण केली. या अनुभवांतूनच जबाबदार आणि निःपक्ष पत्रकार घडतो, असे मत शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजीराव जाधव यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागात आयोजित सातदिवसीय मीडिया लेखन कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विभागप्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी उपस्थित होत्या.
डॉ. जाधव यांनी, माध्यमातील मजकुराकडे नागरिकांनी चिकित्सक दृष्टीने पाहण्याची गरज अधोरेखित केली. माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांवर प्रश्न विचारले गेले, तर माध्यमांची गुणवत्ता उंचावू शकते, असे त्यांनी सांगितले. सोशल मीडियावर वेगाने पसरवली जाणारी माहिती अनेकदा अपुरी किंवा दिशाभूल करणारी असू शकते. त्यामुळे कोणतीही बातमी स्वीकारण्यापूर्वी तिची सत्यता तपासणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. डिजिटल माध्यमांमुळे माहितीचा प्रचंड प्रसार झाला असून, त्यातून माहितीचे प्रदूषण वाढत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. अशा काळात पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत जबाबदारीने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये मीडिया लेखनाबाबत नवी दृष्टी आणि आत्मविश्वास निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमात विद्यार्थी प्रतिनिधी संदीप बरगे व स्वप्नाली धुलुगडे यांनी आपले अनुभव मांडले. कार्यशाळेचे आयोजन डॉ. जयसिंग कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन अविनाश कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीकांत देसाई यांनी केले.





