🔸️ स्वयंसेवक व एनडीआरएफची पथके सज्ज ठेवा
🔸️ पूर परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिक व जनावरांचे वेळेत स्थलांतर करा
🔸️ कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होता कामा नये
🔸️ पुराचे पाणी आलेले रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करा
🔸️ नागरिकांनी पुराच्या पाण्यात वाहने घालू नयेत -जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
कोल्हापूर : सध्या कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळी जवळ म्हणजेच 36 फुटांवर असून जिल्ह्यात पावसाचा जोर असल्यामुळे पाणी इशारा पातळीकडे सरकत आहे. संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करुन प्रशासकीय यंत्रणेने सतर्क रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या. तसेच पुराचे पाणी आलेल्या ठिकाणी नागरिकांनी वाहने घालू नयेत व स्वतःही जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने नियोजन बैठक झाली, यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, गृह विभागाच्या पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व जिल्हास्तरीय अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.
यावेळी तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्याकडून तालुका निहाय पावसाचे प्रमाण, संभाव्य पूर परिस्थिती व केलेल्या नियोजनाची माहिती घेऊन सूचना केल्या. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास व्यक्ती आणि जनावरांचे वेळेत स्थलांतर करण्यासाठी तसेच त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवण्यासाठी चोख नियोजन करा. निवारा व्यवस्था तयार ठेवा. कोणत्याही परिस्थितीत जिवीत हानी होणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना करुन मान्सून परिस्थितीत सर्व विभाग प्रमुखांनी मुख्यालय सोडू नका, असे निर्देश दिले.
आपत्कालीन विभागाने उपलब्ध सर्व साधनसामग्री सज्ज ठेवावी. जिल्ह्यातील स्वयंसेवकांची पथके व एनडीआरएफ चे पथक सज्ज ठेवावे. नागरिकांना पुरस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रशिक्षित बचाव पथके तयार ठेवा. मान्सून काळात रस्ते व पूल पाण्याखाली जातात, अशावेळी नागरिकांकडून पूल ओलांडताना दुर्घटना घडू नये, यासाठी पुराचे पाणी आलेले रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करा व या मार्गावरील वाहतूक तात्काळ पर्यायी मार्गाने वळवा. पूरपरिस्थितीमुळे बाधित होणाऱ्या गावांतील नागरिकांपर्यंत व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे तात्काळ माहिती पोहोचवा. वीज पुरवठा खंडित झाल्यास त्वरित पूर्ववत करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्री तयार ठेवा.
पूर परिस्थितीमुळे पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता असणाऱ्या गावांना मदतकार्य जलद पोहोचवा. स्थलांतरित नागरिकांसाठी पुरेसे अन्नधान्य व औषधसाठा उपलब्ध ठेवा. पूरस्थितीत एकही जनावर वाहून जाऊ नये, यासाठी चोख नियोजन करा. छावणीतील जनावरांसाठी पुरेसे पशुखाद्य, ओला व सुका चारा, औषधसाठा तयार ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी केल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी तालुका निहाय व गाव निहाय केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाची माहिती दिली.