पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी; मुलांसोबत पणती रंगविण्यात आणि आकाश कंदील बनविण्यात उत्साहाने घेतला सहभाग
schedule18 Oct 25 person by visibility 136 categoryराज्य

मुंबई : दिवाळीचा सण म्हणजे फक्त दिव्यांचा, फटाक्यांचा किंवा सजावटीचा उत्सव नाही तर तो माणुसकीचा, प्रेमाचा आणि एकोप्याचा उत्सव आहे, हा विचार करून पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आज एका आगळ्यावेगळ्या आणि हृदयस्पर्शी कार्यक्रमात अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी केली. या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मंत्री श्रीमती मुंडे भावूक झाल्या.
केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि द चिल्ड्रन्स एड सोसायटी फॉर अंडरप्रिव्हिलेज्ड किड्स ऑर्फनेजच्या यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आधुनिक कला दालन, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात श्रीमती मुंडे यांनी भेट दिली. यावेळी आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालक निधी चौधरी उपस्थित होत्या.
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ही अनाथ मुलं कोणत्या जातीची, धर्माची आहेत हे महत्त्वाच नाही, तर ती माणसाची आहेत आणि त्यांच्या डोळ्यांतील आनंद हा समाजासाठी प्रेरणादायी आहे. असा समाज घडला पाहिजे, जिथे प्रत्येक माणूस स्वतःची ओळख स्वतः निर्माण करेल.
प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी पर्यावरण विभागाने समाज माध्यमांद्वारे जनजागृती केली आहे, असे सांगून सर्व नागरिकांनी प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आपण ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळून, निसर्गाशी सुसंगत अशी पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करू, असे श्रीमती मुंडे म्हणाल्या.
यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी मुलांसोबत आकाशकंदील तयार केले. तसेच पणत्या रंगवल्या आणि चित्रकला उपक्रमात सहभागही घेतला. या वेळी आकाश कंदील बनविण्याची कार्यशाळेचे आणि प्रसिद्ध कलाकार ए. ए. अल्मेलकर यांच्या कलाकृतीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.