पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन
schedule21 Oct 25 person by visibility 80 categoryराज्य

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात शहीद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना नायगाव पोलीस मुख्यालय येथील पोलीस स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत व प्रतिनिधी, वरिष्ठ पोलीस अधिकारी व निमंत्रित यांनी देखील पोलीस स्मृतिस्तंभाजवळ जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेश वाचनातून गेल्या वर्षभरात देशात हौतात्म्य प्राप्त झालेल्या ३४ पोलीस अधिकारी व १५७ पोलीस अंमलदार अशा एकूण १९१ वीर शहीदांना त्यांच्या अतुलनीय बलिदानाबद्दल श्रद्धांजली वाहिली.
यावेळी शहीद झालेल्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांची नावे वाचनानंतर पोलीस बँड पथकाद्वारे सलामी शस्त्र धून वाजविण्यात आली. तसेच गणवेशधारी अधिकारी व जवानांनी सलामी दिली. पोलिसांतर्फे अभिवादन म्हणून बंदुकीच्या तीन फैरी झाडण्यात आल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी निमंत्रित देश-विदेशी पाहुणे, वरिष्ठ पोलीस अधिकारी व हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.