SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आपत्तीमध्ये तत्काळ प्रतिसाद द्या; पुढील पाच दिवस सर्व यंत्रणा सतर्क ठेवा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडसायबर जनजागृती, डिजिटल साक्षरता काळाची गरज : महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेबाजार भोगाव येथे NDRF कडून समुदाय जनजागृती व बोट प्रशिक्षणकोल्हापूर पोलिसांची धडक कारवाई; व्हिसा संपलेला कांगो नागरिक हद्दपारगोडसाखरच्या कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्यांचा प्रश्न निघाला निकाली घोडावत विद्यापीठातील फार्मसीच्या विद्यार्थ्याला ३८.४३ लाखाचे पॅकेज​डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात सायबर वॉरियर्स क्लबची स्थापनापिंपळगाव खुर्द येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयास बी. एच. एम. एस. पदवी अभ्यासक्रमाची मान्यताआंतरराष्ट्रीय सहकार दिन: शाश्वत विकासाचा आधारस्तंभकोल्हापूर महानगरपालिका शाळा ठरल्या जिल्ह्यात अव्वल

जाहिरात

 

सायबर जनजागृती, डिजिटल साक्षरता काळाची गरज : महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे

schedule04 Jul 26 person by visibility 181 categoryराज्य

◼️कोल्हापूरातून ‘डिजिटल इम्युनिटी’ पथदर्शी उपक्रमाचा शुभारंभ
◼️सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृतीसाठी राज्यभर टप्प्याटप्प्याने होणार विस्तार

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य महिला आयोग व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थी, महिला व शिक्षकांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी डिजिटल इम्युनिटी : सायबर सुरक्षितता पथदर्शी उपक्रमाचा शुभारंभ आज राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे करण्यात आला. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या ऑनलाइन उपस्थितीत आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन झाले.

मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, सायबर जनजागृती आणि डिजिटल साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. महिला व मुलींसाठी सायबर सुरक्षेचे उपाय प्रभावीपणे पोहोचविणाऱ्या या विशेष पथदर्शी कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्याची निवड झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आयोग, कायदे मंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून डिजिटल साक्षरता अभियान यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी प्रशिक्षण मोहीम अधिक संवादात्मक करण्याचे आणि सहभागींचे प्रश्न, अनुभव व अडचणी लक्षात घेऊन उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे, उपसचिव पदमश्री बनाडे, सहसंचालक शिक्षण कमलादेवी आवटे यांच्यासह प्रशिक्षणार्थी शिक्षक, सायबर पोलीस, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरातील हा पथदर्शी उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. माध्यमिक शाळांमध्ये आठवड्यातून एक तास डिजिटल सुरक्षेसाठी राखीव ठेवावा तसेच या मोहिमेत स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग वाढवावा, असे त्यांनी सुचविले. जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल यांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर नकारात्मक कारणांसाठी न करता सकारात्मक आणि जबाबदारीने करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे यांनी प्रास्ताविक केले.

कोल्हापूरातून सुरू होणारा हा पथदर्शी उपक्रम पुढील काळात राज्यभर टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. इंटरनेट, सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा वाढता वापर लक्षात घेता ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, ओटीपी फसवणूक, सायबर छळ, सोशल मीडियाचा गैरवापर आणि इतर सायबर गुन्ह्यांविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमात सुरक्षित डिजिटल व्यवहार, सोशल मीडियाचा जबाबदार वापर, डिजिटल गोपनीयता, सायबर कायदे, तक्रार निवारण यंत्रणा, इंटरनेट व्यसन, सायबर लैंगिक गुन्हे, डिजिटल वेलनेस तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा सुरक्षित वापर अशा विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

अहान फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली पाटणकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उन्मेष जोशी यांनी सायबर सुरक्षितता, सायबर कायदे, डिजिटल सुरक्षा आणि सायबर वेलनेस या विषयांवर मार्गदर्शन केले. गुगल इंडियाचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी समीर जाधव यांनी ‘गूगल किड्स ट्रस्ट अँड सेफ्टी’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर ‘महातत्त्व’च्या दिप्ती सहानी यांनी गूगल सेफ्टी टूल्सविषयी विशेष सत्र घेतले.

मार्गदर्शक सोनाली पाटणकर, उन्मेष जोशी आणि समीर जाधव यांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून सायबर सुरक्षिततेचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचविण्याचा या उपक्रमाचा उद्देश असून विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित डिजिटल वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिक्षकांनी मोठ्या संख्येने या प्रशिक्षणात सहभागी होऊन मिळालेले ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes