कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधक विद्यार्थ्यांनी ऊर्जा साठवण्यासाठी प्रथमच उपयोगात येणाऱ्या नावीन्यपूर्ण “रेड्यूसड ग्राफेन ऑक्साईड कम्पोझिट विथ पॉलीअॅनालीन फिल्म्स’ बनवण्याच्या सोप्या व कमी खर्चिक ‘सिलार’ या रासायनिक पद्धतीसाठी भारतीय पेटंट प्राधिकरणाकडून पेटंट मंजूर झाले आहे. या शोधाअंतर्गत प्रमाणित केलेली नावीन्यपूर्ण ऊर्जा साठवणुकीची पद्धत पुढील २० वर्षासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नावे पेटंट स्वरूपात संरक्षित केली जाईल.
मुख्य संशोधक प्रा. सी. डी. लोखंडे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, सदर शोध पद्धतीद्वारे तयार केलेल्या पातळ फिती या ऊर्जा साठवणुकीसाठी बनवल्या जाणाऱ्या विद्युत घट, सुपरकपॅसिटर तसेच बॅटरीमध्ये अत्यंत प्रभावी व कार्यक्षम आहेत. या क्षेत्रात सातत्यपूर्ण संशोधन सुरु आहे.
या संशोधनामध्ये मुख्य संशोधक प्रा. सी. डी. लोखंडे व यांच्यासमवेत संशोधक विद्यार्थी दिव्या पवार, अजिंक्य बगडे, आणि सुरज सकपाळ यांचा सहभाग होता. पेटंट मिळवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.