पैजारवाडीत दत्तजयंती महोत्सव उत्साहात
schedule17 Dec 24 person by visibility 192 categoryसामाजिक
कोल्हापूर : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि ओम दत्त चिले ओम च्या गजरात प. पू. सद्गुरू चिले महाराज समाधी मंदिर, क्षेत्र पैजारवाडी (ता.पन्हाळा) येथे श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी लाखो भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घेतला. गुरूचरित्र सप्ताहाबरोबरच दत्तजयंती निमित्त कासवाकृती समाधी मंदिरात पहाटे महाभिषेक, काकड आरती, व विधीवत आकर्षक पूजा करण्यात आली होती. तर दुपारी महाआरती व सायंकाळी पुष्पवृष्टीसह दत्त जन्मकाळ पार पडला. फुलांच्या माळांनी सजवलेला श्रींचा पाळणा जोजवत उपस्थित महिलांनी पारंपरिक पाळणा गायिला. त्यानंतर भाविकांना सुंठवडा वाटप करण्यात आले. रात्री भक्तांच्या अलोट गर्दीत भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
दत्तजयंती निमित्त दुसऱ्या दिवशी भव्य महाप्रसादाचे आयोजन केले होते, यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
दरम्यान विविध ठिकाणांहून श्रीक्षेत्र पैजारवाडीत दाखल झालेल्या पायी पालखी रथाचे व दिंडी सोहळ्याचे संस्थानकडून अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, व्यवस्थापक ह.भ.प. बाबुराव गलांडे, सचिव विनायक जाधव, विश्वस्त जयसिंगराव पारखे, बळवंतराव घोसाळकर (गुरूजी), यांनी स्वागत केले.पुजारी बापूजी यादव, पैलवान महादेव भोसले,आदींनी या सोहळ्यातील सर्व धार्मिक विधी विनम्र सेवाभावाने पार पाडला.
यावेळी कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, पुणे, मुंबई, सोलापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतील श्रींच्या भक्तांनी सहभागी होऊन श्रीसेवेचा लाभ घेतला. या संपूर्ण सोहळ्यात प्राथमिक आरोग्य केंद्र,बोरपाडळे यांचे वैद्यकीय सेवा पथक कार्यरत होते तर कोडोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता.