राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये बारामतीच्या खेळाडूंची दैदीप्यमान कामगिरी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून खेळाडूंचा गौरव
schedule11 Nov 26 person by visibility 47 categoryराज्य
बारामती : राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती आणि बुद्धिबळ स्पर्धांमध्ये बारामती तालुक्यातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलेल्या खेळाडूंचा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून गौरव करण्यात आला.
दिल्ली येथे पार पडलेल्या ७० व्या नॅशनल स्कूल गेम्स २०२६-२७ कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बारामतीच्या दोन खेळाडूंनी पदकांची कमाई केली, तर राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत एका खेळाडूने देशात प्रथम क्रमांक पटकावून बारामतीचा नावलौकिक वाढविला आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कु. श्रावणी संजय शिंदे हिने १४ वर्षांखालील ३३ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णयश संपादन केले. तर कु. समृद्धी प्रवीण सावंत हिने १४ वर्षांखालील ३० किलो वजन गटात तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक पटकावले.
खेळाडूंनी भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करून राज्याचा आणि देशाचा नावलौकिक वाढवावा. राष्ट्रीय स्तरावर बारामतीच्या खेळाडूंनी मिळवलेले हे यश नवोदित खेळाडूंसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या यशामुळे बारामतीच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा आणि दिशा मिळाली असल्याचे श्रीमती पवार यांनी सांगितले. दोन्ही खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर बारामतीचे नाव उज्ज्वल केले. तसेच राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. अनुष्का बापू कुतवळ हिने १९ वर्षांखालील मुलींच्या गटात देशात प्रथम क्रमांक मिळवत ऐतिहासिक यश संपादन केले. तिच्या या कामगिरीमुळे बारामतीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला नगराध्यक्ष सचिन सातव, संभाजी नाना होळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, बारामती तालुका दूध संघाचे संचालक कौस्तुभ चव्हाण, मलारी बंडलकर आणि सौरभ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्व मान्यवरांनी यशस्वी खेळाडूंचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांचे, क्रीडा शिक्षकांचे तसेच पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.