महाराष्ट्र दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात महाडायलिसीस सेवांचा विस्तार
schedule29 Apr 26 person by visibility 102 categoryराज्य
कोल्हापूर : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या आणि सहज उपलब्ध आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सुरू केलेली ‘महाडायलिसिस’ योजना सध्या राज्यातील विविध सरकारी रुग्णालयांमध्ये प्रभावीपणे राबवली जात असून मोफत डायलिसिस सुविधेमुळे हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.
महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने कोल्हापूर जिल्ह्यात महाडायलिसीस सेवांचा विस्तार करण्यात येत असून, जिल्ह्यातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालय राधानगरी, ग्रामीण रुग्णालय कागल, ग्रामीण रुग्णालय आजरा तसेच उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथे डायलिसीस सेवा उपलब्ध असून, या केंद्रांमधून जिल्ह्यातील अनेक रुग्ण नियमितपणे उपचार घेत आहेत.
1 मे 2026 रोजी ग्रामीण रुग्णालय मुरगुड येथे नवीन डायलिसीस केंद्राचे लोकार्पण आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या नव्या केंद्रामुळे परिसरातील रुग्णांना अधिक सुलभ व दर्जेदार सेवा मिळणार आहे. तसेच, येत्या मे महिन्यात जिल्ह्यातील गांधीनगर वसाहत रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय शिरोळ ,ग्रामीण रुग्णालय मलकापूर, ग्रामीण रुग्णालय चंदगड येथेही महाडायलिसीस सेवा सुरू करण्यात येणार असून, जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा दर्जा आणखी उंचावणार आहे.
या सर्व केंद्रांमध्ये प्रशिक्षित डायलिसिस तंत्रज्ञ, नर्सेस आणि इतर सहाय्यक कर्मचारी असे मनुष्यबळ कार्यरत असून, नेफ्रोलॉजिस्टच्या मार्गदशनखाली उपचारांची गुणवत्ता सुनिश्चित केली जात आहे. स्वच्छता, सुरक्षितता आणि वैद्यकीय मानकाचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. या सेवेमध्ये रुग्णांना रक्त तपासणी, आवश्यक इंजेक्शन, आहार तज्ञांचा सल्ला इत्यादी सेवा निशुल्क प्राप्त होत आहे. शासनाच्या विविध आरोग्य योजनांअंतर्गत पात्र रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात डायलिसीस सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.
या उपक्रमामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य सुविधांना अधिक बळकटी मिळत असून गरजू रुग्णांना त्यांच्या घराजवळ उपचार उपलब्ध झाल्यामुळे मोठा आधार मिळणार आहे.