गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश
schedule17 Jan 26 person by visibility 217 categoryराजकीय
▪️मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक विश्वास नारायण पाटील (आबाजी) यांनी ठाणे (मुंबई) येथे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
ठाणे येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आयोजित या प्रवेश कार्यक्रमास आमदार चंद्रदीप नरके, शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी, सहकार व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास पाटील यांचे शिवसेना पक्षात स्वागत करून त्यांच्या सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ कार्याचा गौरव केला.
विश्वास पाटील (आबाजी) हे गेल्या अनेक दशकांपासून सहकार चळवळीत सक्रिय असून, गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकरी, ग्रामीण भागातील सर्वसामान्य घटक यांच्या हितासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. संघटन कौशल्य, पारदर्शक कारभार आणि शेतकरी हिताला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
या प्रवेशावेळी विश्वास पाटील यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र सचिन पाटील, यशवंत बँकेचे माजी चेअरमन एकनाथ पाटील, बुद्धीराज पाटील (महे), नंदकुमार पाटील, वीरशैव बँकेचे माजी अध्यक्ष अनिल सोलापुरे, रयत संघाचे संचालक तसेच विविध सहकारी, सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, “सहकार क्षेत्रातील अनुभवी व तळागाळाशी जोडलेले नेतृत्व शिवसेनेत आल्याने पक्षसंघटन अधिक बळकट होणार आहे.” विश्वास पाटील यांचा अनुभव व मार्गदर्शन ग्रामीण भागात शिवसेनेच्या कार्याला नवी दिशा देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अजित नरके, एस. आर. पाटील (चिखलीकर), करवीर पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील पाटील, कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे, संचालक किशोर पाटील, उत्तम वरुटे, संजय पाटील, पंडित हुजरे, सामाजिक कार्यकर्ते अमित वरुटे, राहुल पाटील, माधव पाटील, एस. के. पाटील, पंडित वरुटे, पार्थ पाटील, राजवीर पाटील तसेच शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला सहकार व करवीर मधील ग्रामीण भागात अधिक भक्कम आधार मिळणार असून, संघटनात्मक बांधणीस निश्चितच चालना मिळेल, अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत होती.