कोल्हापुरात गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक; १.५ लाखांचा मुद्देमाल जप्त
schedule28 May 26 person by visibility 106 categoryगुन्हे
कोल्हापूर : शहरातील जरगनगर भागात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एका १९ वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिताफितीने अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे २ किलो ३६ ग्रॅम गांजा, एक मोबाईल आणि मोटारसायकल असा एकूण १,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अमिरहमजा शकिल नदाफ (वय १९, रा. पाचगाव, ता. करवीर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी खास पथके तयार केली होती. जरगनगर येथील एसबीआय बँकेच्या जवळ एक इसम मोटारसायकलवरून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि त्यांच्या पथकाने जरगनगर येथे सापळा रचला आणि मोटारसायकलवरून आलेल्या संशयित आरोपीला पाठलाग करून ताब्यात घेतले.
दोन पंचांसमक्ष आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे गांजा आणि इतर साहित्य आढळून आले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि पोलीस उपअधीक्षक सुजीतकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने केली आहे.