सडोली खालसा येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर करवीर पोलिसांचा छापा; १३ जणांवर कारवाई, ३ लाख ८२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त
schedule01 Nov 26 person by visibility 165 categoryगुन्हे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सडोली खालसा गावाच्या हद्दीत कडकाचा माळ नावाच्या शेतात सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर करवीर पोलिसांनी छापा टाकला आहे. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, जुगार खेळणाऱ्या व जुगारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या एकूण १३ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सडोली खालसा येथील गणपती पाटील यांच्या जनावरांच्या शेडमध्ये काही जण तीन पानी पत्त्यांचा 'पलास' नावाचा जुगार पैसे लावून खेळत असल्याची खात्रीशीर माहिती करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४:१० वाजता गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांनी सदर ठिकाणी छापा टाकला.
या छाप्यात जयदीप गोविंद पाटील (रा. हळदी), धीरज महादेव मोहिते, सनी अशोक महापुरे पाटील, तुषार तानाजी पाटील, विठ्ठल लक्ष्मण खाडे, सर्वेश मधुकर जाधव, वैभव सदाशिव पाटील (सर्व रा. सडोली खालसा), रवींद्र आकाराम कांबळे (रा. वाशी), कृष्णात शशिकांत मदने (रा. ईश्वरपूर, सांगली), उत्तम वसंत पाटील (रा. कोथळी), सागर लक्ष्मण सातपुते (रा. कोल्हापूर), शिवाजी गोविंद पाटील (रा. हळदी) हे १२ जण जुगार खेळताना रंगेहात सापडले.
तसेच जुगारासाठी शेड उपलब्ध देणारा जागा मालक गणपत वसंत पाटील (रा. सडोली खालसा) या १३ व्या व्यक्तीसह एकूण १३ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईदरम्यान आरोपींकडून ८ मोटारसायकल, १२ मोबाईल हँडसेट आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ८२ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक सुहास पोवार आणि गुन्हे शोध पथकातील अंमलदारांच्या पथकाने पार पाडली.