महापालिकेच्या नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रास शासनाचा कायाकल्प पुरस्कार
schedule11 Oct 24 person by visibility 300 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर - महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातंर्गत शहरातील नागरीकांना वैद्यकीय सेवा गुणात्मक व दर्जात्मक देण्यासाठी शासनामार्फत कायाकल्प ही योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत सन 2023-24 मध्ये महापालिकेच्या नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र यांना कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार प्रशासक के.मंजूलक्ष्मी व उपायुक्त पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाला आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील पंचगंगा हॉस्पिटल व सावित्रीबाई फुले हॉस्पिटल या नागरी सामुदायिक आरोग्य संस्था व 11 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामार्फत शासन निर्देशानुसार वेगवेगळे राष्ट्रीय आरोग्यविषयक कार्यक्रम राबविण्यात येतात. या योजनेअंतर्गत रूग्णालयाची व नागरी प्राथमिक आरोग्य संस्थेमध्ये परिसर स्वच्छता, दर्जात्मक सेवा, स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासनामार्फत कायाकल्प पुरस्कार योजना राबविली आहे. यामध्ये स्वच्छता व संसर्ग नियंत्रण पध्दतीला प्राधान्य देण्यात येते. या आरोग्य संस्थेचे मूल्यांकन राज्य स्तरावरील समिती मार्फत करणेत येते. सन 2023-24 मध्ये पंचगंगा हॉस्पिटल व सावित्रीबाई फुले हॉस्पिटल या नागरी सामुदायिक आरोग्य संस्था व 11 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांचे राज्य शासनाच्या समितीव्दारे मूल्यांकन करण्यात आले असून यामध्ये पंचगंगा हॉस्पिटल, नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र, फिरंगाई प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, राजारामपुरी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, पंचगंगा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, कसबा बावडा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, आयसोलेशन प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, फुलेवाडी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, सिध्दार्थ नगर प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र या आरोग्य संस्था पात्र झाल्या आहेत. या आरोग्य संस्थांना कायाकल्प योजनेअंतर्गत प्रोत्साहनात्मक पुरस्कार शासनामार्फत जाहीर झाला असून यामध्ये पंचगंगा हॉस्पिटलला रू.1 लाख व उर्वरीत 7 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांना प्रत्येकी रू.50 हजार इतक्या रक्कमेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
यासाठी आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा यांचे नियोजनानुसार आरसीएच नोडल ऑफिसर डॉ.अमोलकुमार माने, शहर कार्यक्रम व्यवस्थापक अमोल महाडिक, सर्व प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, संबंधित आरोग्य संस्थाचे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.