समूह विद्यापीठांनी मानांकन उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहावे: राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा कुलगुरूंच्या बैठकीत सल्ला
schedule17 Apr 26 person by visibility 84 categoryशैक्षणिक
वारणानगर : महाराष्ट्राचे राज्यपाल तथा वारणा विद्यापीठाचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील समूह विद्यापीठांच्या कुलगुरूंची महत्त्वपूर्ण बैठक लोकभवन मुंबई येथे पार पडली. या बैठकीत वारणा विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रो. डॉ. डी. टी. शिर्के व प्रभारी कुलसचिव डॉ. आर. बी. पाटील उपस्थित होते. मा. कुलगुरू प्रो. डॉ. डी. टी. शिर्के यांनी वारणा विद्यापीठाचा सविस्तर अहवाल सादर केला.
राज्यपाल महोदय जिष्णू देव वर्मा यांनी समूह विद्यापीठांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकनात आपले स्थान उंचावण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून गुणवत्ता वृद्धी करावी. समाज उपयोगी उपक्रमाच्या अनुषंगाने क्षयरोग (TB) निर्मूलनाबाबतही विद्यापीठांनी सहभाग घ्यावा असे निर्देश दिले. समाजात यासंबंधी जनजागृती करण्यासाठी विद्यापीठांनी प्रयत्नशील राहून विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा, मराठी व हिंदी भाषेतील घोषवाक्य, कविता इत्यादींसारखे नाविन्यक्रम उपक्रम राबवावेत असे त्यांनी सुचविले.
यासंदर्भात वारणा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. डी. टी. शिर्के यांनी विद्यापीठांतील महाविद्यालयांनी क्षयरोग निर्मूलनाबाबत जनजागृती उपक्रम आराखडा तयार करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. तसेच विद्यापीठ कार्यक्षेत्रात क्षयरोगाचा एक ही रुग्ण सापडू नये एवढ्या व्यापक प्रमाणात उपक्रम आयोजित करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
नियोजित उपक्रमासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनय कोरे व विद्यापीठाचे कुलाधिकारी, एन. एच. पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो. डॉ. विलास कार्जिनी यांनी सर्व घटक महाविद्यालयानी सहभागी होणे बाबत सूचित केले.