डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थिनींना ‘आयईईई’ शिष्यवृत्ती
schedule03 May 26 person by visibility 132 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, कसबा बावडा येथील दोन विद्यार्थिनींनी प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स वुमन्स इन इंजीनियरिंग (आयईईई डब्ल्यूआयई) शिष्यवृत्ती मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ ३० विद्यार्थिनींची निवड या शिष्यवृत्तीसाठी करण्यात आली आहे. यामध्ये महाविद्यालयातील द्वितीय वर्ष, इलेक्ट्रॉनिक्सच्या ऋतुजा कुंथे आणि सिद्धी कोपार्डे यांचा समावेश आहे.
या शिष्यवृत्तीअंतर्गत विद्यार्थिनींना लॅपटॉप, मोफत आयईईई कोर्सेस तसेच जागतिक स्तरावर प्लेसमेंटसाठी मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून दिल्या जातात. या दोन्ही विद्यार्थिनींना डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांच्याहस्ते हे लॅपटॉप प्रदान करण्यात आले आहेत.
या यशाबद्दल ऋतुजा व सिद्धी यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, कुलसचिव डॉ. लितेश मालदे, विभागप्रमुख डॉ. तानाजीराव मोहिते- पाटील, प्रा. मनीषा भानुसे यांनी अभिनंदन केले.
IEEE स्टुडंट ब्रांच काउन्सेलर डॉ. मनिषा विकास भानुसे यांनी सांगितले की, “हे यश विद्यार्थिनींच्या कठोर परिश्रमाचे आणि संस्थेतील उत्कृष्ट मार्गदर्शनाचे फलित असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी आहे.”
महाविद्यालयाच्या IEEE स्टुडंट ब्रांचच्या स्थापनेच्या पहिल्याच वर्षात मिळालेले हे यश विशेष मानले जात असून, यामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणखी बळ मिळाले आहे.