'श्रावणबाळां'च्या 'सतेज'तेचे मांडलिकत्व झुगारले; किंचित 'परिवर्तन' घडले
schedule07 Jan 22 person by visibility 979 categoryराजकीय
गेले आठवडे-दोन आठवडे जिल्ह्याचे राजकारण कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने अक्षरशः ढवळून निघाले. जिल्ह्यातील शेतकरी, सेवा संस्था, दूध संस्था, बचत गट, इतर लघु उद्योगांना जिल्हा बँकेतूनच मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा केला जातो. त्यांच्याशी दररोज संलग्नित असलेल्या जिल्हा बँकेवर सत्ता स्थापनेसाठी राजकारण्यांची चढाओढ असते. त्यात राज्याचे नेतृत्व करणारे मंत्रीही अपवाद नाहीत.
राज्यात आघाडी करून सत्तेत आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पाऊल उचलले होते. मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक हे सहाजण त्यांच्या तालुक्यातून सेवा संस्था गटातून बिनविरोध निवडून आले. पण जागावाटपावरून माशी शिंकली आणि आघाडीत बिघाडी झाली. चर्चा फिस्कटल्याने शिवसेनेने राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी या नावाखाली निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. तर भाजपने सत्तारूढ गटासोबत राहणे पसंत केले. सत्तारूढ गटाचे नेतृत्व बँकेचे अध्यक्ष ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे होते. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, शेकापचे माजी आमदार संपतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी सत्तारूढ गटाविरुद्ध शड्डू ठोकला. जागावाटपावेळी विनय कोरे यांनी तीव्र विरोध केल्याने बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांना संजय मंडलिक यांनी उमेदवारी देत 'परिवर्तन'च्या पंखाखाली घेतले.
५ जानेवारीला बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान होते. त्याआधी १२ तालुक्यांत प्रचाराचे रान उठले. मेळावे झाले. यात एरव्ही एकमेकांच्या मांड्याना मांड्या लावून बसणाऱ्यांनी एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक केली. कुणी कुणाची तुलना अदानी, अंबानींशी केली, तर कुणी खास पदाच्या मर्यादेची जाणीव करून दिली. एकदाचे ५ जानेवारीला मतदान झाले. मतदारांनीही ९८ टक्के मतदान करत निकाल कुणाच्या पारड्यात जाणार याबाबत उत्सुकता निर्माण केली.
अखेर आज, शुक्रवारी ७ रोजी उत्कंठा शिगेला पोहोचविणाऱ्या या निवडणुकीचा निकाल लागला. यात संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन आघाडीने सत्ताधारी गटाला चांगलाच घाम फोडल्याचे पहावयास मिळाले. 'श्रावणबाळां'ना एकतर्फी 'सतेज' विजय मिळवीत आपण जिल्हा बँकेचे 'राजेंद्र' होऊ असे वाटत होते. मात्र, 'परिवर्तन' आघाडीने ४ जागा जिंकत या मनसुब्यावर पाणी फेरले. त्यातच सत्तारूढ गटाने नाकारलेले बाबासाहेब पाटील मोठ्या मतांनी निवडून आल्याने सत्तारूढ गटाच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे झाले. एकंदरीत, सत्तारूढ गटाचे आठ उमेदवार निवडून आले तरी त्यांना अपेक्षित होता तास निकाल लागला नाही. आमदार प्रकाश आवाडे यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला अर्जुन आबिटकर यांच्याकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. गडहिंग्लजमधून अप्पी पाटील, तर शाहूवाडीतून सर्जेराव पाटील यासारख्या मातब्बर नेत्यांनाही पराभवाचा धक्का बसला. या निवडणुकीत निकालाच्या गोळाबेरजेत सत्ताधारी गटाने वर्चस्व राखले असले तरी परिवर्तन आघाडीने दिलेली कडवी झुंज कौतुकास्पदच!
- अंतिम निकाल असा :
- विकास सेवा संस्था गट : राजेंद्र पाटील-यड्रावकर, विनय कोरे, सुधीर देसाई, रणवीरसिंह गायकवाड, रणजित पाटील, संतोष पाटील.
- कृषी पणन गट : संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर.
- नागरी बँक पतसंस्था गट : अर्जुन आबिटकर.
- इतर मागासवर्गीय गट : विजयसिंह माने.
- अनुसूचित जाती गट : राजूबाबा आवळे.
- विमुक्त जाती जमाती गट : स्मिता गवळी.
- इतर शेती संस्था व व्यक्ती सभासद गट : प्रताप ऊर्फ भैय्या माने.
- महिला प्रतिनिधी गट : निवेदिता माने, श्रुतिका काटकर.