ज्ञान, कौशल्य व सकारात्मक दृष्टिकोन ही यशाची त्रिसूत्री : संजय बाबर
schedule21 Feb 26 person by visibility 180 categoryशैक्षणिक
🟠 केआयटी च्या ‘पायोनियर’ या राष्ट्रीय स्पर्धेत ६००० तंत्रज्ञान स्नेही विद्यार्थ्यांचा सहभाग.
येथील केआयटी अभियांत्रिकी प्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाच्या वतीने दिनांक २१-२२ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्तरावरील पायोनियर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.आज या कार्यक्रमाचे उद्घाटन कमिन्स इंडिया या उद्योगाचे पुणे प्लांट हेड श्री.संजय बाबर यांच्या हस्ते संपन्न झाले. देशभरातील १४ राज्यातून जवळपास ९० हून अधिक महाविद्यालयातून ६००० विद्यार्थी या दोन दिवसाच्या दरम्यान होणाऱ्या विविध टेक्निकल स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत. १०० हून अधिक उद्योजक व संशोधक या स्पर्धेचे मूल्यांकन करण्यासाठी केआयटी मध्ये उपस्थित असणार आहेत.
संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी या उद्घाटनपर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागतपर भाषण केले. ते म्हणाले, “ २९ वर्षे ही स्पर्धा सातत्याने आयोजित करताना या स्पर्धा आयोजित करण्याचा मुख्य हेतू हा विद्यार्थ्यांना स्वतःचे तांत्रिक ज्ञान व कौशल्य व्यक्त करण्यासाठी दिलेली संधी आहे.तसेच विविध तांत्रिक प्रश्नांवरती अभियांत्रिकीचे विद्यार्थी सकारात्मक विचाराने अत्यंत योग्य असे उत्तर काढू शकतात ”. अशा सृजनशील कल्पनांना वाव देण्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित करत असल्याचे ते म्हणाले. अशा स्पर्धांच्या आयोजनातून आयोजक विद्यार्थ्यांना सुद्धा अनेक गोष्टींचे भान येते. तसेच दिलेल्या जबाबदारीतून त्यांना बरेच काही शिकता येते अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
पायोनियर-२६ चे निमंत्रक डॉ. संदीप देसाई यांनी पूर्ण स्पर्धेतील संख्यात्मक तपशील उपस्थितांसमोर ठेवला.२१-२२ फेब्रुवारी २६ या दोन दिवसात होणाऱ्या मध्यवर्ती 3 स्पर्धा अभिव्यक्ती, प्रकल्प,गेमिंग व विभागश: होणाऱ्या ९ स्पर्धांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग,पारितोषिके याबाबत तपशिलवार माहिती दिली.संपूर्ण स्पर्धेमध्ये एकूण रुपये ५ लाख रोख रकमेची पारितोषिके विद्यार्थ्यांना दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.या टेक्नो उत्सवात आय.आय.टी..एन.आय.टी.,बिट्स,सह महत्त्वाच्या खाजगी विद्यापीठे तसेच बेंगलोर,दिल्ली ,हरियाणा, आसाम, बिहार,केरळ,कर्नाटक,गोवा,गुजरात,मध्यप्रदेश,आंध्रप्रदेश,तेलंगाना या राज्यातून विद्यार्थ्याचा सहभाग या स्पर्धे मध्ये असणार असल्याबाबत त्यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक श्री संजय बाबर,प्लांट हेड कमिन्स इंडिया यांनी मुख्यत्वे करून तीन गोष्टींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एक सध्या इंडस्ट्री काय स्तरावरती काम करत आहे ? भविष्यात इंडस्ट्रीला कोणत्या प्रकारची प्रगती करायची आहे ? दोन उद्योग क्षेत्र तरुण नवअभियंत्यांकडून कोणत्या अपेक्षा ठेवत आहे ? व तिसरी गोष्ट या स्पर्धात्मक युगामध्ये आपला दृष्टिकोन व तत्व कशा प्रकारे आपण सांभाळली पाहिजेत. आपल्या भाषणात ते म्हणाले, “ ज्ञान, कौशल्य व सकारात्मक दृष्टिकोन हीच भविष्यातील यशाची त्रिसूत्री असणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने या तीन गोष्टींवरती स्वतःला सिद्ध करत उद्योग क्षेत्रामध्ये योगदान देण्यासाठी स्वतःला तयार करावे ”. नजरे पलीकडील स्वप्ने पहा, मानसिक दृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या स्वतःला सक्षम बनवा व अभ्यासक्रमाबाहेरील ज्ञान मिळवण्यासाठी पुढाकार घ्या असा मौलिक सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली यांनी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या जागतिक एआय कार्यक्रमातील फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मायक्रोन यांच्या भाषणाचा संदर्भ घेत म्हणाले, “ सध्या भारत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बदलांना सामोरा जात आहे.कारण तो बदलांना विचारपूर्वक स्विकारत आहे. बदलांना स्विकारत प्रगती करत असल्यामुळे तो वास्तवात जगाचे नेतृत्व काही विषयांमध्ये करत आहे.” जर विविध क्षेत्रात होणारे सकारात्मक बदल जर तुम्ही स्वीकारले नाहीत तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या व देशाच्या प्रगतीमध्ये मोठा अडसर निर्माण करत आहात असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.स्पष्ट दिशा,केद्रभूत विचार व प्रत्यक्ष योगदान जर केले तर आपला देश नक्कीच विकसित भारत म्हणून लवकरच नावारूपाला येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. उपस्थित सहभागी विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे सचिव दीपक चौगुले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व महालक्ष्मीची मूर्ती देऊन संपन्न झाले.उद्घाटन कार्यक्रमासाठी संस्थेचे रजिस्ट्रार डॉ.डी.जे.साठे, सर्व अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आय.एस.टी.ई. स्टुडन्ट चाप्टर विद्यार्थी प्रमुख आदित्य पाटील यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले. यावेळी मंचावरती अधिष्ठाता विद्यार्थी उपक्रम डॉ.जितेंद्र भाट व आय.एस.टी.ई.च्या स्टुडन्ट चाप्टर च्या प्राध्यापक सल्लागार प्रा.अश्विनी शिंदे या उपस्थित होत्या. मुख्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मांगरीश प्रभावळकर ,रेबेका डिसूजा यांनी केले. तसेच मुख्य अतिथींचा परिचय व उर्वरित कार्यक्रमाचे संचालन एंजल तांबे व साक्षी शर्मा या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक द फर्न कोल्हापूर,मिन्त्राडॉटकॉम असून केआयटी-आय.आर.एफ,व्ह.एम.के.3 डी प्रिंटींग,नेक्सजन, ए.सी.प्रोफेशनल, ध्वजारंभ अॅस्ट्रो वास्तू हे सह-प्रायोजक आहेत.