कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश
schedule31 Oct 24 person by visibility 976 categoryराजकीय
मुंबई : कोल्हापूर उत्तर विधानसभेचे विद्यमान आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी आज मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी उत्तरचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने यावेळी उपस्थित होते. जयश्री जाधवांची शिवसेना उपनेत्या म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत त्या प्रवेश करणार असल्याचे वृत्त सकाळी समोर आले होते. तसेच आज सकाळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व कोल्हापूर उत्तरमधील महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागरही ही तातडीने मुंबईला रवाना झाले होते.
आज गुरुवारी, ३१ ऑक्टोबर रोजी बाराच्या सुमारास विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी शिवसेनेत मुंबईत प्रवेश केला.
दरम्यान आमदार जाधव निवडणूक लढवण्याबाबत इच्छुक होत्या त्यांनी काँग्रेसकडून विधानसभा उमेदवारीसाठी मुलाखत दिली होती. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. मधुरिमाराजे छत्रपती यांनी २९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी विद्यमान आमदार जयश्री जाधव अनुपस्थित होत्या. यावरुन त्यांची नाराजी दिसून येत होती. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर जाधव या २०२२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या होत्या.