SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शक्तीपीठ महामार्गविरोधात आज आझाद मैदानावर मोर्चापंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कोणती कार्यवाही केली : आ. सतेज पाटील यांचा तारांकित प्रश्नएच.एम.पी.व्ही. व जी.बी.एस. हे आजार रोखण्याकरीता कोणती उपाययोजना केली : आमदार सतेज पाटील यांचा अधिवेशनात प्रश्नसंगणकशास्त्र अधिविभागामध्ये महिला दिनानिमित्त विविध स्पर्धायज्ञ फौंडैशन यांच्याकडून 75 क्षयरुग्ण दत्तकउंचगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजनरस्ते अपघात रोखण्यासाठी 'अल्कोहोल' सोबतच आता 'ड्रग्स' सेवन तपासणीही करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईककेआयटीमध्ये गुरूवारी शाश्वत शेतीविषयी व्याख्यानकेआयटी ला आयएसटीई चा ‘बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मिंग इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट’ हा पुरस्कार प्राप्तआंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागासाठी डॉ. प्रभंजन माने फ्रान्सला रवाना

जाहिरात

 

संकटाचे संधीत रुपांतर करणारी व्यक्तीच उद्योजक बनू शकते: विनया गोरे; शिवाजी विद्यापीठात नवोपक्रम, स्टार्टअप परिषदेचा समारोप

schedule15 Feb 25 person by visibility 324 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या संकटाचे रुपांतर संधीत करणारी व्यक्तीच चांगली उद्योजक बनू शकते, असे प्रतिपादन अमेरिकेतील गोरे उद्योग समूहाच्या प्रमुख विनया गोरे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या ‘विकसित भारत-२०४७ साठी नवोपक्रम आणि स्टार्टअप्स’ या विषयावरील ‘शिक्षण, उद्योग आणि शासन परिषद १.०’मध्ये आज दुसऱ्या दिवशीच्या प्रथम सत्रात त्या बोलत होत्या. परिषदेत आज विविध परिसंवादांमधूनही नवोपक्रम आणि स्टार्टअप याविषयी मोठ्या प्रमाणावर मंथन झाले. पीएम-उषा अर्थसहाय्यित आणि नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य केंद्र आणि एसयूके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेचा सायंकाळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत समारोप झाला.

विनया गोरे म्हणाल्या, अनेक लोकांचा असा गैरसमज आहे असतो की अमेरिकेत स्टार्टअपना मोठ्या प्रमाणात संधी आहे. प्रत्यक्षात सर्वेक्षण असे सांगते की, अमेरिकेतील ८० ते ९० टक्के स्टार्अप अयशस्वी होतात. त्याला संकल्पनेपासून ते उभारणीपर्यंत अनेक बाबी कारणीभूत असतात. शिवाजी विद्यापीठाकडून प्रोत्साहित केलेल्या स्टार्टअपच्या बाबतीत एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, ती म्हणजे प्रत्येक प्रकल्पाला व्यवस्थित मार्गदर्शन व सहकार्य पुरविले जाते. एखाद्या संकल्पनेचे स्टार्टअपमध्ये रुपांतर करण्याच्या दृष्टीने ही फार महत्त्वाची बाब असते. मात्र, त्यापुढे जाऊन उद्योजक, व्यावसायिक होऊ इच्छिणाऱ्यांनी आपले नेटवर्किंग वाढविण्यावर भर दिला पाहिजे. समाजामध्ये निरनिराळ्या घटकांशी जर आपण योग्य पद्धतीने सहसंबंध प्रस्थापित केले, तर त्याचा आपल्याला दूरगामी लाभ होतो.

उद्योगात यशस्वी होण्यासाठी तीन बाबी फार महत्त्वाच्या असल्याचे सांगून विनया गोरे म्हणाल्या, आपल्याकडे हार्ड स्कील भरपूर असतात, मात्र सॉफ्ट स्कील्सच्या बाबतीत आपण कमी पडतो. त्यामुळे चांगले उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांनी आपले सॉफ्ट स्कील्स विकसित करण्यावर भर द्यायला हवा. त्यानंतर भावनिक बुद्धिमत्ता ही बाबही फार आवश्यक ठरते. जगात कुठेही गेले तरी कमीअधिक प्रमाणात माणसे भावनिक असतात. त्यांच्या भावनांना आपल्याला योग्य पद्धतीने हात घातला यायला हवा. तिसरी बाब म्हणजे सर्जनशील पद्धतीने समस्या सोडविता यायला हव्यात. कोणतीही समस्या सामोरी आली की भावनेपेक्षा वस्तुनिष्ठ आणि कृतीशीलतेने तिचा विचार करून त्यावर सर्जनशील आणि कायमस्वरुपी तोडगा योजण्याचा विचार करता यायला हवा. त्याखेरीज, ग्राहकांनी आपल्या उत्पादनाकडे येण्याची अपेक्षा न बाळगता ग्राहक जिथे आहेत, अशा ठिकाणी आपले उत्पादन कसे तातडीने पोहोचविता येईल, याचा विचार करायला हवा. त्याचप्रमाणे आजकाल डिसरप्टिव्ह इनोव्हेशनला प्रचंड संधी आहेत. याचे प्रमाण कमी असले तरी एखाद्या संकल्पनेमध्ये तशा प्रकारची क्षमता असल्यास ती ओळखता यायला हवी. तसे झाल्यास जगामधील प्रचलित बाबींचा चेहरामोहरा बदलून टाकता येते. त्यामुळे आपल्या संकल्पनेचा अगदी स्टार्टअपच्या पुढे तिथवरचा विचार करता येतो का, हेही पाहण्याची आवश्यकता आहे, असे त्या म्हणाल्या.

जगातल्या दोनशे कंपन्यांचा आढावा घेतला असता योग्य वेळ, चांगले सहकारी आणि चांगले काम, संकल्पनेमधील सच्चेपणा, योग्य बिझनेस मॉडेल आणि अंतिमतः निधी हे घटक याच प्राधान्यक्रमाने त्यांच्या यशात वाटा उचलत असतात, असेही गोरे म्हणाल्या.

यानंतर पुढे दिवसभरात नवोन्मेष आणि स्टार्टअप यांच्या अनुषंगाने तीन महत्त्वाची चर्चासत्रे पार पडली. पहिल्या चर्चासत्रात संशोधन आणि धोरणे या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. यामध्ये राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे वरिष्ठ संशोधक डॉ. प्रकाश वडगावकर, डॉ. सी.व्ही. रोडे यांच्यासह बारामतीचे कृषी उद्योजक संकेत भोसले, कायपी मशीन्सचे संजय पेंडसे, शिंपुगडे उद्योग समूहाचे चेअरमन बी. एस. शिंपुगडे आणि बँक ऑफ इंडियाचे गणेश गोडसे सहभागी झाले. डॉ. आण्णासाहेब गुरव अध्यक्षस्थानी होते. पुढील चर्चासत्रांत महिला उद्योजकांना नवोपक्रम आणि स्टार्टअप उपक्रमांमध्ये असलेल्या संधी आणि आव्हाने या अनुषंगाने तपशीलवार चर्चा करण्यात आली. यामध्ये विद्यापीठाच्या ज्येष्ठ संशोधक डॉ. ज्योती जाधव यांच्यासह महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुजाता कणसे, ‘अवनि’च्या अनुराधा भोसले, भारती डिजीटलच्या तनुजा शिपूरकर, ‘छबी ब्रँड’च्या सुप्रिया पोवार आणि प्युअरमी ऑर्गेनिकच्या शर्मिली माने यांनी सहभाग घेतला. डॉ. दीपा इंगवले अध्यक्षस्थानी होत्या.

अंतिम चर्चासत्र हे यशस्वी स्टार्टअपच्या यशकथांनी रंगले. यामध्ये श्रील सूर्या रिसर्च कंपनीच्या सुप्रिया कुसाळे, थिंकमाँक एज्युटेकचे जैमीन शाह, बायोब्रिट कंपनीचे परिमल उदगावे, आरडे-पाटील फार्माचे सत्यनारायण आरडे, गोला कंपनीचे वरुण जैन आणि टेक-पीएमजी बिझनेस सोल्युशनचे अमित चव्हाण यांनी आपापल्या संघर्षाचा काळ आणि त्यातून यशापर्यंत केलेली वाटचाल याविषयी सांगितले.

▪️फेलोशीप घेणाऱ्यांनी सहभागी व्हायला हवे : प्र-कुलगुरू डॉ. पाटील

शिवाजी विद्यापीठासह अनेक वित्तीय संस्थांकडून अनेक संशोधकांना फेलोशीप मिळतात. मात्र, अशा संशोधकांचा आणि महाविद्यालयीन शिक्षकांचा गेल्या दोन दिवसांतल्या नवोपक्रम व स्टार्टअप परिषदेत अल्प सहभाग दिसला. या सर्व फेलोशीपधारकांनी पुढील वर्षापासून सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्याची गरज आहे, अशी अपेक्षा प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी समारोप समारंभात व्यक्त केली. या परिषदेच्या माध्यमातून स्टार्टअपच्या अनुषंगाने एक उत्तम इकोसिस्टीम विद्यापीठात आकारास येत आहे, याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.

परिषदेचा समारोप समारंभ त्यांच्यासह ज्येष्ठ संशोधक डॉ. प्रकाश वडगांवकर, डॉ. प्रकाश राऊत आणि डॉ. सागर डेळेकर यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी परिषदेत सहभागी उद्योजक, व्यावसायिक आणि शाळा यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes