शक्तीपीठ महामार्गविरोधात आज आझाद मैदानावर मोर्चा
schedule12 Mar 25 person by visibility 180 categoryराज्य

कोल्हापूर : नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा आज बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावर काढण्यात येणार आहे. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या पुढकाराने होत असलेल्या या मोर्चात दहा हजारांहून अधिक बाधित शेतकरी सामील होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून चार हजार शेतकरी सोमवारी सायंकाळीच मुंबईकडे रवाना झाले. आझाद मैदानात आज सकाळी ९ वाजता या मोर्चाला सुरुवात होईल.
काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, तासगावचे आमदार रोहित पाटील, कळंबचे आमदार कैलास पाटील, उमरगा येथील आमदार प्रवीण स्वामी, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संजय घाटगे, शेकापचे माजी आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे.
कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, बीड, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच या महामार्गाला विरोध दर्शिवला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आंदोलने करण्यात आली. आता या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून अधिवेशन काळात थेट आझाद मैदानात एल्गार पुकारण्यात आला आहे. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी केले.