कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक मतमोजणीसाठी तयारी पूर्ण
schedule17 Dec 25 person by visibility 64 categoryराज्य
• २१ डिसेंबर रोजी मतमोजणी
• राज्य निवडणूक आयोगाकडून कोल्हापूरचे विशेष अभिनंदन
• गडहिंग्लज नगरपरिषदेच्या एका जागेसाठी २० डिसेंबर रोजी मतदान
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपालिकांमधील निवडणुका यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. या अनुषंगाने सर्व ठिकाणी मतमोजणीसाठी आवश्यक सुविधांची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. ऑनलाईन बैठकीतून राज्य निवडणूक आयोगामार्फत तयारीबाबत सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, सहआयुक्त नगरप्रशासन नागेंद्र मुतकेकर यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील १० नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींमधील निवडणुका ३१८ मतदान केंद्रांवर पार पडल्या. या निवडणुकांची मतमोजणी संबंधित १३ नगरपालिका ठिकाणी होणार आहे. या कामासाठी एकूण ७९० अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांचे दोन प्रशिक्षण सत्र पूर्ण झाली असून तिसरे प्रशिक्षण प्रगतीपथावर आहे.
मतमोजणीसाठी एकुण टेबल व कंसात मतमोजणी फेऱ्या पुढिल प्रमाणे - जयसिंगपूर १३ (५), मुरगूड ६(२), मलकापूर ५(२), वडगाव १०(३), गडहिंग्लज ११(४), कागल ६(७), पन्हाळा ५(२), कुरुंदवाड १०(३), हुपरी ५(७), शिरोळ ११(३), आजरा १०(२), चंदगड ९(२) आणि हातकणंगले ७(३).
फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यासाठी लाऊडस्पीकरसह इतर सोयींची व्यवस्था करण्यात आली आहे. माध्यम कक्षाचीही व्यवस्था करण्यात आली असून आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. तसेच आवश्यक साहित्य त्या त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. गडहिंग्लज येथील प्रभाग क्रमांक ३ अ येथे निवडणूक २० डिसेंबर रोजी होणार आहे. यासाठी २४७९ मतदारांसाठी ३ मतदान केंद्रांवर मतदान होईल.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीत जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रांवर चोख नियोजनासह संबंधित राजकीय प्रतिनिधींना आवश्यक माहिती बैठकीतून देण्याच्या सूचना केल्या. त्यांनी सांगितले की, निकालानंतर काढण्यात येणाऱ्या विजयी मिरवणुकांबाबत कायदा आणि सुव्यवस्था योग्य प्रकारे अमलात आणावी. कुठेही मिरवणुका, रॅली निघणार नाहीत याची दक्षता घ्या. सर्व ईव्हीएमची सुरक्षितता, सुरक्षा आणि स्ट्राँग रूमबाबत आवश्यक काळजी घ्यावी.
पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना, तडीपार, समन्स, वॉरंट आणि गुन्ह्यांबाबत माहिती दिली. कोल्हापूरसह इचलकरंजी नियंत्रण कक्षामार्फत सर्व ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. सर्व १३ स्ट्राँग रूम ठिकाणी सशस्त्र एसआरपीएफचे १ जवान तसेच ३ आर्मगार्ड तैनात करण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी ८ पोलीस उपविभागीय अधिकारी, १२ पोलीस निरीक्षक, ५५ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ४६३ पोलीस अंमलदार आणि ८०० होमगार्ड नेमण्यात आले आहेत.
▪️राज्य निवडणूक आयोगाकडून कोल्हापूरचे विशेष अभिनंदन
पार पडलेल्या १३ ठिकाणच्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यात एकूण ७८.८७ टक्के मतदानाची नोंद झाली. यामध्ये मुरगूड – ८८.४३%, मलकापूर – ८६.९९%, आणि वडगाव – ८६.२४% या नगरपरिषदा राज्यात मतदान टक्केवारीत पहिल्या तीन क्रमांकांवर आहेत. या अनुषंगाने मतदार जनजागृती आणि मतदान प्रक्रिया प्रभावीपणे राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता तसेच सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या टीमचे विशेष अभिनंदन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बैठकीत केले.





