कष्टकरी जनताच धर्मांध फॅसिस्ट शक्तीचा बिमोड करेल : डॉ. भारत पाटणकर; प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांचा जाहीर नागरी सत्कार
schedule18 Dec 24 person by visibility 192 categoryसामाजिक
कोल्हापूर : जात आणि धर्माचा आधार घेऊन कष्टकरी माणसाला गुलाम बनवणारे नवीन राजकारण आपल्या देशात उभे केले जात आहे. काहीही करून, ईव्हीएम मशीनचा आधार घेऊन सत्तेत येण्याचे लोकशाहीला घातक ठरणारे कारस्थान केले जात आहे. आज देश नव्या हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहे. ही हुकूमशाहीवादी धर्मांध फॅसिस्ट शक्तीचा बिमोड सर्वसामान्य कष्टकरी जनताच करेल असे प्रतिपादन डॉ. भारत पाटणकर यांनी केले.
ते सामाजिक-राजकीय चळवळीतील नेते, समतावादी सांस्कृतिक चळवळीचे प्रणेते, समाज आणि संस्कृतीचे अभ्यासक, दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे हे साठ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांचा राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी झालेल्या जाहीर नागरी सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उदय नारकर म्हणाले, चळवळीची कुटुंबे परिवर्तनाची केंद्रे बनली पाहिजेत. जात आणि धर्माच्या नावावर होणारे राजकारण संपवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. प्रा. गौतमीपुत्र कांबळे म्हणाले, सर्वसामान्य जनतेची नवी व्यापक चळवळ उभी करणे गरजेचे आहे ते काम डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे म्हणाले, मी आयुष्यभर सर्वसामान्य जनतेसाठी काम केले आहे. इथून पुढेही जनतेसाठी माझे आयुष्य खर्ची पाढेन. प्रस्थापित व्यवस्थेला धडकी भरेल अशी एक व्यापक चळवळ उभी करेन.
यावेळी अनिल म्हमाने, प्रा. पुष्पलता सकटे, दगडू दाते गुरुजी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. स्वागत डॉ. माधवराव गादेकर, प्रास्ताविक डॉ. सोमनाथ कदम, सूत्रसंचालन स्वप्निल गोरंबेकर तर आभार अंतिमा कोल्हापूरकर यांनी मानले.