कोल्हापुरात उद्यापासून रमजान पर्वाला प्रारंभ; आज रात्री पहिली 'तरावीह'
schedule18 Feb 26 person by visibility 154 categoryसामाजिक
कोल्हापूर :कोल्हापूरसह संपूर्ण देशात मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान महिन्याला उद्या, गुरुवार दि. १९ फेब्रुवारी २०२६ पासून सुरुवात होत आहे. 'उलमा हिलाल कमिटी' (चांद कमिटी) कोल्हापूरच्या वतीने आज चंद्रदर्शनाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
आज १८ फेब्रुवारी रोजी, मुस्लिम बोर्डिंगच्या कार्यालयात सायंकाळी मगरिब नमाजनंतर हिलाल कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षपद मौलाना मन्सूर आलम कासमी यांनी भूषविले.
यावेळी कोल्हापूर कमिटीने मुंबई हिलाल कमिटीसह पाटणा, देवबंद, बंगलोर, लखनौ आणि दिल्ली येथील हिलाल कमिट्यांशी संपर्क साधला. विविध शहरांमधून चंद्रदर्शनाची खात्रीशीर साक्ष मिळाल्यानंतर, उद्यापासून उपवासाला (रोजे) सुरुवात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
रमजानचा चंद्र दिसल्याने आज, बुधवार दि. १८ फेब्रुवारीच्या रात्रीपासूनच मशिदींमध्ये विशेष 'तरावीह' नमाज पठणाला सुरुवात झाली आहे. उद्या पहाटे 'सहरी' करून मुस्लिम बांधव पहिला रोजा ठेवतील.
या बैठकीला कमिटीचे अध्यक्ष मौलाना मन्सूर आलम कासमी, दि मोहमेदन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गणी आजरेकर, मौ. इरफान कासमी, मौ. मुबीन बागवान, काजी अशरफ, मौ. नाझिम पठाण, हाफिज युनूस, ज. जाफरबाबा सय्यद यांसह कोल्हापूर शहर व उपनगरातील मशिदींचे पेशइमाम आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.