कौशल्याधारित शिक्षणच समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचे साधन: एम. बी. शेख यांचे प्रतिपादन
schedule27 Aug 26 person by visibility 156 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : "शिक्षण हेच समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचे साधन आहे. कौशल्याधारित शिक्षण घेतलेले तरुण यापुढं जगाच्या स्पर्धेत टिकून राहतील. त्यामुळं मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं आणि त्यासाठी लागेल ते योगदान देण्याची तयारी माता-पित्यांनी ठेवली पाहिजे," असे महत्वपूर्ण उद्गार रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष एम. बी. शेख यांनी काढले.
कोल्हापुरातील ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या वतीनं १० वी आणि १२ वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या तरुणांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष एम. बी. शेख यांनी भूषवले. यावेळी व्यासपीठावर गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. मेहजाबीन महिशाळे, अझरुद्दीन शेख, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलीस निरीक्षक आस्मा मुल्ला, ताज मुल्लाणी आणि नगरसेविका दिलशाद मुल्ला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना डॉ. मेहजाबीन महिशाळे यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी लागणारे दाखले, कागदपत्रे तसेच शासनाच्या शिष्यवृत्तीविषयक योजनांविषयी सविस्तर माहिती दिली. याशिवाय इतर मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना करिअरबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांसह १० वी-१२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून गौरवण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महबूब मुल्ला, जीवन मुजावर, चांदभाई जत्राटे, हाजी बाबासाहेब शेख, रफिक शेख, दस्तगीर बागवान, बापूसो मुल्ला, काझी, निसार शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.