SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
ज्येष्ठ संगीतकार, गायक श्रीधर फडके यांच्या गीतांनी जिंकली कोल्हापूरकरांची मनेगणरायावर मान्यवरांकडून पुष्पवृष्टी; ‘कुबुद्धीचे विसर्जन करून सर्वांना सुबुद्धी येवो’ ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूरचा पर्यावरणस्नेही विक्रम! इराणी खणात तब्बल २,९१९ गणेशमूर्तींचे विसर्जन; प्रशासनाची २५ तासांहून अधिक अविरत सेवाजागतिक कर्णबधिर दिन: समाजाची जबाबदारी आणि समावेशकतासमाज माध्यमांमध्ये असत्य व अर्धसत्याचा महापूर; पत्रकारांनी 'सत्य' जनतेपर्यंत पोहोचवावे : राज्यपाल जिष्णु देव वर्मावारणा स्कूल ऑफ लॉमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अंतिम संधीस्व. अण्णासाहेब पाटील यांच्या 93 जयंतीनिमित्त अभिवादनकोल्हापूर जिल्ह्यात 11 ऑक्टोबरपर्यंत बंदी आदेश लागू‘आत्मा’तर्फे सोमवारी रानभाजी महोत्सवाचे आयोजनकोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत २१ फुटी बाप्पाची मूर्ती कोसळली!

जाहिरात

 

ज्येष्ठ संगीतकार, गायक श्रीधर फडके यांच्या गीतांनी जिंकली कोल्हापूरकरांची मने

schedule26 Sep 26 person by visibility 119 categoryराज्य

• महागणेशोत्सव कार्यक्रमाला भरभरुन दाद
• वन्स मोअर आणि टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाला प्रतिसाद
• बाबूजींचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचं नातं; भरभरुन प्रेम दिल्याबद्दल कोल्हापूरकरांना धन्यवाद ! - ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके

कोल्हापूर: देव देव्हाऱ्यात नाही.. देव नाही देव्हारे.., सखी मंद झाल्या तारका.., कानडा राजा पंढरीचा.., ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था.. तुज नमो.., फिटे अंधाराचे जाळे.. आकाशी झेप घेरे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजरा.., कानडा राजा पंढरीचा.., तेजोमय नाद ब्रम्ह हे.. जय शारदे वागेश्वरी.., येवो विठ्ठले.. भक्तजन वत्सले.. अशी अनेक अजरामर भाव, भक्तीगीते, प्रेमगीते सादर करुन ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके यांनी कोल्हापूरकरांची मने जिंकली. त्यांनी सादर केलेल्या अनोख्या सूरमयी प्रवासात रसिक हरवून गेले.

 गायिका शिल्पा पुणतांबेकर व शेफाली साकोलीकर यांनी सुरेल साथ देत अनेक गीते सादर केली. यावेळी सादर केलेल्या गीतांना रसिकांनी "वन्स मोअर" म्हणत टाळ्यांच्या कडकडाटात भरभरुन दाद दिली.

 गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात भक्ती, संस्कृती, कला आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू स्मारक भवन येथे "महागणेशोत्सव" निमित्त ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके यांच्या सुगम संगीताचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.

 कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, पोलीस अधीक्षक डॉ. निलोत्पल, गुणीदास फाउंडेशनच्या अध्यक्षा सुश्मिता सप्रे, संस्थापक राजप्रसाद धर्माधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. 

     देव देव्हाऱ्यात नाही.. देव नाही देव्हारे या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.. फुलले रे क्षण माझे.., मन कशातच लागत नाही..,  आदी माया अंबाबाई.., तुला पाहिले.. नदीच्या किनारी.., तू कधी वेणीस फुल खोवतेस ना.., बाई मी विकत घेतला शाम.., तूच चंद्रमा नभात.., माता भवानी जगताची जननी.. अशी अनेक गीते, अभंग, भाव, भक्तीगीते, प्रेमगीते, लावणी सादर करत रसिकांची दाद मिळवली. पहिल्या गीतापासूनच कोल्हापूरकरांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. जगदीश खेबुडकर, सुधीर मोघे, सुरेश भट, ग्रेस यांच्या सह अनेक दिग्गज गीतकारांची गीते श्रीधर फडके यांनी सादर केली. यावेळी 

गायिका शिल्पा पुणतांबेकर व शेफाली साकोलीकर यांनी सुरेल गायन करत उत्तम साथ दिली. तबल्यासाठी तुषार आगरे, बासरीसाठी डॉ. सचिन जगताप, की बोर्ड साठी सुनील गुरव, साईड रिदम ला अनिकेत ससाने यांनी उत्तम साथ दिली. "आयुष्य आणि अध्यात्म यांना जोडणारा दुवा म्हणजे संगीत".. "सुंदर गायन तिथे रंगले मन.." अशा शब्दात सुकन्या जोशी यांनी केलेल्या उत्कृष्ट निवेदनाने कार्यक्रम अधिक खुलत गेला. संदीप चव्हाण यांनी ध्वनी व्यवस्था केली. तर मिलिंद अष्टेकर यांनी रंगमंच व्यवस्था व सागर भोसले यांनी सजावट केली.

◼️बाबूजींचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचं नातं :  ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके

ज्येष्ठ स्वरसम्राट सुधीर फडके म्हणजेच बाबूजींचं कोल्हापूरशी अत्यंत जिव्हाळ्याचं नातं होतं. बाबूजींचा जन्म कोल्हापूर मध्ये झाला होता. त्याचबरोबर त्यांच्या सांगीतिक प्रवासाची पायाभरणी याच भूमीत झाली होती. पंडीत वामनराव पाध्ये यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतल्याचे ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके यांनी सांगितले.  ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था.. तुज नमो हे गीत श्रीधर फडके यांच्या सोबत उपस्थित रसिकांनी गायले तेव्हा "कोल्हापूरकर उत्तम आणि सुरात गायले, हे मुंबईत गेल्यावर मी सर्वांना नक्की सांगेन. कोल्हापूरकरांनी.. माझ्या गाव वाल्यांनी भरभरुन प्रेम केल्याबद्दल धन्यवाद.. ! ", अशा शब्दांत श्री. फडके यांनी कोल्हापूरकरांचे आभार मानले.

 कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने महागणेशोत्सवानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला गर्दी केली होती. "नाद खुळा" कार्यक्रम झाल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितांनी दिल्या. अनेकांनी उभे राहून, स्टेज च्या बाजूला बसून कार्यक्रमाचा आनंद घेतला. विविध क्षेत्रातील दिग्गज, अधिकारी व संगीत प्रेमी कार्यक्रमास उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes