सांगलीतील महिला बुद्धिबळ स्पर्धेत 'केन चेस अकॅडमी'च्या खेळाडूंचे यश
schedule23 May 26 person by visibility 109 categoryक्रीडा
कोल्हापूर : सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका मानाच्या महिला बुद्धिबळ स्पर्धेत इचलकरंजी आणि जयसिंगपूर येथील 'केन चेस अकॅडमी'च्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे. नूतन बुद्धिबळ मंडळाच्या वतीने सांगली येथे २० वी मीनाताई शिरगावकर स्मृती खुली महिला जलद बुद्धिबळ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत अकॅडमीच्या अनेक खेळाडूंनी विविध वयोगटांत आणि खुल्या गटात अव्वल स्थाने पटकावत आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. या सर्व यशस्वी खेळाडूंचे आणि त्यांच्या पालकांचे इचलकरंजी व जयसिंगपूर परिसरात कौतुक होत आहे.
स्पर्धेच्या खुल्या गटात सिद्धी बुबने हिने १२ वा, नारायणी घोरपडे हिने २० वा, सांची चौधरी हिने २१ वा, रेश्मा नलवडे हिने २२ वा, शनाया मालानी हिने २७ वा आणि मृणाल पांडव हिने २८ वा क्रमांक पटकावला. या सर्व खेळाडूंना प्रत्येकी १,००० रुपये रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
विशिष्ट वयोगटातील स्पर्धांमध्येही अकॅडमीच्या चिमुरड्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली. ७ वर्षांखालील गटात अद्विता देसाई हिने तृतीय क्रमांक मिळवून ३०० रुपये व ट्रॉफी जिंकली, तर कांची हुलीकिरे हिला देखील ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. ९ वर्षांखालील गटात मुद्रा पाटील, सेजल जाजूंदा आणि कनक जाजुंदा यांनी आकर्षक ट्रॉफीवर आपले नाव कोरले. ११ वर्षांखालील गटात श्रुती पांडव हिने प्रथम क्रमांक पटकावत ५०० रुपये आणि ट्रॉफीवर कब्जा केला; तर प्रज्ञा पोरलेकर, गार्गी गुरव व मनस्वी शिरगुरे यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
१३ वर्षांखालील गटात धनश्री पोरलेकर हिने ४०० रुपये व ट्रॉफी, निधी पाटील हिने ३०० रुपये व ट्रॉफी, मीरा गणपुले हिने २०० रुपये व ट्रॉफी पटकावली, तसेच मैथिली केने व जीविका जाजुंदा यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. १५ वर्षांखालील गटात पूर्वा कुलकर्णी हिने २०० रुपये आणि ट्रॉफी मिळवली. याशिवाय पूर्वा पाटील, सई बुबने आणि श्रेया हबीब यांनीही स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.
या सर्व खेळाडूंना 'केन चेस अकॅडमी'चे मुख्य प्रशिक्षक, फिडे डी.आय. आणि वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहित पोळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.