विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे : डॉ. अजितकुमार पाटील
schedule28 Nov 26 person by visibility 121 categoryशैक्षणिक
कसबा बावडा : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, शिक्षक हाच समाजाचा खरा शिल्पकार आहे. शाळा ही केवळ इमारत नसून संस्काराचे मंदिर आहे, असे प्रतिपादन केंद्रमुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील यांनी केले. ते कसबा बावडा (कोल्हापूर) येथील होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये आयोजित केंद्रीय शिक्षण परिषद क्र. ५ च्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
रोपास पाणी अर्पण करून परिषदेची उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात सुरुवात झाली. या परिषदेस ३४ शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांच्या अध्यापन पद्धतीतील बदलांवर यावेळी सखोल चर्चा झाली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी, चिकित्सक वृत्ती आणि सर्जनशीलता जोपासण्यावर भर देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिस्त आणि संस्कार वाढवण्यासोबतच परीक्षेत मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग व पालकांशी नियमित संपर्क साधण्याचा निर्णय घेण्यात आला.
परिषदेत एकूण पाच सत्रे पार पडली. पहिल्या सत्रात डॉ. अजितकुमार पाटील यांनी मागील महिन्याचा आढावा घेतला. दुसऱ्या सत्रात प्रियंका नानीवडेकर यांनी विचारमंथन घडवून आणले, तर तिसऱ्या सत्रात सुनिता बरीगाल यांनी पाठाच्या मासिक नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. चौथ्या सत्रात पुष्पा दास यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या मासिक बैठकीची माहिती दिली आणि पाचव्या सत्रात संभाजी नलवडे व रविंद्र खोगे यांनी कार्यशिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी सेवाभावी आणि कर्तव्यदक्ष कार्यपद्धतीबद्दल रविंद्र खोगे, संभाजी नलवडे, पुष्पा दास, सुनिता बरीगाल आणि प्रियंका नानीवडेकर यांचा अभिनंदन पत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
पुढील महिन्यात विज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजनही या बैठकीत निश्चित करण्यात आले. शाळांच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेख पद्धतीने करण्यात आले. सुषमा जाधव व विकास लोंढे यांनी आभार मानले. या प्रेरणादायी परिषदेचे कसबा बावडा परिसरातून कौतुक होत आहे.