डी वाय पाटील विद्यापीठात शिवजयंती उत्साहात साजरी; मेडिकल कॉलेज स्टूडेंट कौन्सिल कडून आयोजन, पालखी, लेझीमच्या तालावर वातावरण शिवमय
schedule19 Feb 26 person by visibility 91 categoryसामाजिक
कोल्हापूर : डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्यवतीने मेडिकल कॉलेज येथे गुरुवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हलगी व लेझीमच्या तालावर शिवाजी महाराजांच्या जयघोषाने वातावरण शिवमय बनले.
विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षा राजनंदिनी निंबाळकर (मेडिकल कॉलेज) यांच्या नेतृत्वाखाली तसेच विद्यार्थी परिषदेच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये मेडिकल, फिजिओथेरपी, नर्सिंग, फार्मसी आणि इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते शिवजयंती पोस्टरचे अनावरण करण्यात आले. कुलगुरू डॉ. राकेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थिती शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, आयक्यूएसी संचालक डॉ. शिंपा शर्मा, डीन डॉ. राजेश ख्यालप्पा, फिजिओथेरपी प्राचार्य डॉ. अमृतकुंवर रायजदे, नर्सिंग प्राचार्य डॉ. उमराणी, फार्मसी प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवजयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिवचरित्रावर आधारित नाटिका (स्किट), पारंपरिक नृत्य, पोवाडा, गायन तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता. एकूण १५ कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी पालखी सोहळ्यासह हलगी व लेझीम नृत्य सादर करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण परिसर शिवमय वातावरणाने भारावून गेला.