स्थानिक पातळीवर स्टार्टअप संस्कृतीचा विकास महत्त्वाचा: अश्विनी दाणीगोंड
schedule20 Jan 26 person by visibility 51 categoryशैक्षणिक
▪️शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
कोल्हापूर : जागतिक स्तरावर झेप घेण्यासाठी स्थानिक पातळीवर स्टार्टअप संस्कृतीचा विकास होणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, असे प्रतिपादन प्रख्यात उद्योजक अश्विनी दाणीगोंड यांनी केले.
शिवाजी विद्यापीठात आजपासून दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय शिक्षण-उद्योग-शासन परिषदेस प्रारंभ झाला. परिषदेच्या उद्घाटन समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव अध्यक्षस्थानी होत्या, तर अमेरिकेतील रोवान विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. कंडलम् रामानुजाचार्य आणि नवी दिल्ली येथील डी.आर.डी.ओ.च्या महासंचालक डॉ. चंद्रिका कौशिक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
श्रीमती दाणीगोंड म्हणाल्या, उद्योजकता विकासाच्या प्रक्रियेमध्ये आजघडीला नवोन्मेषाला पर्याय नाही. त्यासाठी केवळ मूल्यांकनावर नव्हे, तर मूल्यनिर्मितीवर भर देण्याची आवश्यकता आहे. शिक्षण, उद्योग आणि शासन हा विद्या, बुद्धी आणि शक्ती यांची त्रिवेणी संगम असून त्या माध्यमातूनच देशात उद्योग-व्यवसायांचे सक्षमीकरण करणे शक्य आहे. ‘विकसित भारत@२०४७’ ही संकल्पना आपल्याला प्रत्यक्षात आणावयाची असल्यास त्या प्रक्रियेमध्ये शैक्षणिक क्षेत्रात योगदान अत्युच्च असण्याची आवश्यकता आहे. उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन गुणवत्तासंपन्न विद्यार्थी देशाला सोपविण्याची जबाबदारी उच्चशिक्षण संस्थांवर आहे. स्थानिक गुणवत्ता जास्तीत जास्त पारखून आणि निवडून देशाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामील केले पाहिजे. आजच्या मंथनातून जे सृजन घडेल, त्यातून उद्याच्या भारताचे भवितव्य साकार होईल. राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये शिक्षण, आरोग्य, कृषी या मूलभूत क्षेत्रांसह सर्वच क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे उपयोजन करण्यासाठी सुसज्ज असे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात निर्माण करण्याची जबाबदारी अशा परिषदांमधून पार पाडली गेली पाहिजे. त्यामध्ये सातत्य राहण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रा. रामानुजाचार्य म्हणाले, शैक्षणिक क्षेत्राला उद्योगांच्या गरजांनुसार आपल्या संशोधनाच्या दिशा ठरवाव्या लागतात. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील नवनव्या प्रवाहांवर शैक्षणिक क्षेत्राचे बारीक लक्ष असणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने शिक्षण-उद्योग सहकार्य परिषदा कळीची भूमिका बजावतात.
यावेळी डॉ. चंद्रिका कौशिक यांनीही मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी वाहून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. श्रीमती दाणीगोंड यांच्या हस्ते परिषदेच्या ई-स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. परिषदेचे समन्वयक डॉ. सागर डेळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सहसमन्वयक डॉ. सुभाष माने यांनी आभार मानले. उद्घाटन समारंभाला विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव यांच्यासह ज्येष्ठ संशोधक डॉ. प्रकाश वडगांवकर, मलेशियाचे डॉ. मोहम्मद याझीद, ऑस्ट्रेलियाचे डॉ. महेश सूर्यवंशी, डॉ. कैलास सोनवणे, डॉ. संजय चव्हाण, डॉ. कल्याणराव गरडकर यांच्यासह शिक्षण, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.