शिरोली नाका ते पंचगंगा नदीपर्यंत उड्डाणपूल उभारणीसाठी प्रयत्न करणार : खासदार धनंजय महाडिक यांचे आश्वासन; महापालिका आयुक्तांसमवेत आज विशेष बैठक
schedule27 Nov 22 person by visibility 1313 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : शहरातील पंचगंगा स्मशानभूमीचे विस्तारीकरण केले जाईल आणि चार ठिकाणी विद्युत दाहिनी सुरू केली जाईल. तसेच पंचगंगा स्मशानभूमी शेजारी जनावरांसाठी विद्युत दहन यंत्रणा बसवण्यासाठी केंद्राकडून निधी उपलब्ध होऊ शकतो. त्यादृष्टीने महापालिकेने प्रस्ताव द्यावा, अशी सूचना खासदार धनंजय महाडिक यांनी महापालिका अधिकार्यांना केली. कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी, शिरोली नाका ते शिवाजी पुलापर्यंत उड्डाणपूल उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. शहराच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी खासदार महाडिक यांनी आज महापालिका आयुक्तांसमवेत विशेष बैठक घेतली.
या बैठकीला प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची उपस्थिती होती.
कोल्हापूर शहरातील पंचगंगा स्मशानभूमीसह, चार स्मशानभूमीत विद्युत दाहिनी बसवण्यासाठी, तसेच एका ठिकाणी जनावरांसाठी विद्युत दाहिनी तयार करण्यासाठी केंद्र शासनाकडून निधी मंजूर होऊ शकतो. त्यादृष्टीने महापालिकेने प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना खासदार धनंजय महाडिक यांनी प्रशासनाला केली. केएमटीसाठी केंद्राकडून १० इलेक्ट्रिकल बसची मागणी केली आहे. पण १० लाख लोकसंख्येचा निकष असल्याने, बसेस उपलब्ध होण्यात अडचणी आहेत, असे अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टीना गवळी यांनी सांगितले. ज्या ग्रामीण भागात केएमटी बस जाते, त्या गावांतील लोकसंख्या शहराच्या लोकसंख्येत समाविष्ट करून, नवीन प्रस्ताव दिला, तर केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त बसेस मिळवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार महाडिक यांनी दिले. कोल्हापूर शहरात सध्या ११ नागरी आरोग्य केंद्रे आहेत. आणखी ११ आरोग्य केंद्रे उभारण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रत्येकी २१ लाखांचा निधी उपलब्ध झालाय. या निधीतून लवकरात लवकर आरोग्य केंद्रे उभारावीत. त्याचबरोबर सीपीआरवरील प्रसूतीचा ताण कमी करण्यासाठी, कदमवाडी परिसरात महापालिकेचे प्रसूतीगृह उभारणीसाठी प्रयत्न करू, असे खासदार महाडिक म्हणाले.
कोल्हापूर शहरातील क्रीडांगणं विकसित करण्यासाठी, खेलो इंडिया योजनेतून केंद्र शासनाने हॉकी स्टडियमसाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. त्यापैकी अडीच कोटींची कामे पूर्ण झालीत. उर्वरित ३ कोटी रुपये लवकरात लवकर उपलब्ध व्हावेत, यासाठी पाठपुरावा केला जाईल. तसेच हॉकी स्टेडियमशेजारी प्रॅक्टिस टर्फला ७ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. तो मिळवण्यासाठी प्रयत्न करू, मुक्तसैनिक आणि एलआयसी ग्राऊंडच्या विकासासाठी निधी मिळण्यासाठी प्रस्ताव द्यावा, अशी सूचना खासदार धनंजय महाडिक यांनी प्रशासनाला केली.
कोल्हापूर शहरात ६४ उद्याने आहेत. त्यातील महावीर आणि हुतात्मा गार्डन या दोन उद्यानासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी प्राप्त झालाय. त्यातून दोन उद्यान चांगली विकसित करावीत. तसेच इतर उद्यानांसाठीही निधी उपलब्ध केला जाईल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाण पुलाची आवश्यकता असल्याचेे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले.
शिरोली जकात नाका ते शिवाजी पुलापर्यंतच्या उड्डाण पुलाचा प्रस्ताव आणि आराखडा तयार करावा. राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयातून त्याला मंजुरी घेऊ, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली. कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी पार्किंगची सुविधा व्हावी, यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावेत. व्हिनस कॉर्नर गाडीअड्डा आणि गोकुळ हॉटेल शेजारी बहुमजली पार्किंग उभारणीबाबत विचार करावा. सयाजी हॉटेलशेजारी असणार्या केएमटी पार्किंगच्या जागेत खासगी बसेसना पार्किंगची जागा उपलब्ध होण्यासाठी महापालिकेने प्रस्ताव द्यावा, अशी सूचना खासदार महाडिक यांनी केली. परीख पुलाला पर्याय म्हणून दुसर्या भुयारी पुलाला रेल्वेने मंजुरी दिलीय. महापालिकेने त्यासाठी १० लाख रुपये भरले आहेत. मंजूर असलेला पादचारी उड्डाणपूलही लवकरच उभारला जाईल, असेही खासदार महाडिक यांनी नमूद केले. महानगरपालिकांच्या शाळांचा दर्जा चांगला होण्यासाठी जे आवश्यक आहे, त्यासाठी निधी उपलब्ध करू, असे खासदार महाडिक यांनी बोलून दाखवले.
आढावा बैठकीला माजी नगरसेवक सत्यजित कदम, राजसिंह शेळके, आशिष ढवळे, शेखर कुसाळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.