कोल्हापूर : बाजार गेट, पान लाईन परिसरातील अनधिकृत हातगाड्यांवर महापालिकेची धडक कारवाई
schedule04 Sep 26 person by visibility 162 categoryमहानगरपालिका
◼️85 हातगाड्यांची तपासणी; अनधिकृत साहित्य कायमस्वरूपी जप्त
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. 2, छत्रपती शिवाजी मार्केट, इस्टेट व अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वतीने बाजार गेट व पान लाईन परिसरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत हातगाड्यांवर आज धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान बायोमेट्रिक धारकांच्या एकूण 85 हातगाड्या आढळून आल्या.
कारवाईमध्ये 9 लोखंडी खाट, 16 बुट्या, 5 टेबल, 16 पार्किंग जाळ्या, 1 टेंट, 8 लोखंडी पाईप, 12 खुर्च्या, 23 प्लास्टिक साहित्य तसेच संपूर्ण मांडव जप्त करण्यात आला. तसेच 25 हातगाड्या संबंधित मालकांनी स्वतःहून हटविल्या. महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरू केल्यानंतर काही हातगाडीधारक व विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांनीही स्वतःहून साहित्य हटविले.
महापालिका पथकाकडून वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न हटविणाऱ्या व्यावसायिकांवर प्रत्यक्ष कारवाई करून संबंधित अनधिकृत साहित्य जप्त करण्यात आले.
महानगरपालिकेच्या ठराव क्र. 83, दि. 18 मे 2026 नुसार अतिक्रमण कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले अनधिकृत साहित्य संबंधित व्यवसायधारकांना परत न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आजच्या कारवाईत जप्त करण्यात आलेले अनधिकृत साहित्य कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त किरणकुमार धरवाडे, सहायक आयुक्त स्वाती दुधाणे, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे व कनिष्ठ लिपिक सजन नागलोत यांनी केली. यावेळी अतिक्रमण विभाग, इस्टेट विभाग, लक्ष्मीपुरी पोलीस कर्मचारी तसेच विभागीय कार्यालय क्र. 2 मधील कर्मचारी उपस्थित होते.
100 मीटर परिसरातील फेरीवाला अतिक्रमणे स्वतःहून हटविण्याचे आवाहन
कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील प्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था तसेच सर्वसाधारण रुग्णालयांच्या परिसरातील फेरीवाला अतिक्रमणाबाबत मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दि. 18 ऑगस्ट 2026 रोजी आदेश पारित केला आहे. या आदेशानुसार प्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था व सर्वसाधारण रुग्णालयांपासून 100 मीटरच्या परिसरात हॉकिंग अथवा फेरीवाला व्यवसायास परवानगी देणे योग्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील संबंधित परिसरात अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाले व व्यावसायिकांनी आपले अतिक्रमण तसेच व्यवसायाचे साहित्य तात्काळ स्वतःहून हटवावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
संबंधितांनी अतिक्रमण स्वतःहून न हटविल्यास महानगरपालिकेमार्फत सदर अतिक्रमणे हटविण्याची कठोर कारवाई करण्यात येणार असून कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले अनधिकृत साहित्य परत केले जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.