कोल्हापुरातील दुर्दैवी घटना: आईचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले, अन् चिमुकल्या मुलीचा बसखाली सापडून दुर्दैवी मृत्यू
schedule19 Jul 23 person by visibility 970 categoryगुन्हे
कोल्हापूर : अंगणवाडीत शिकणा-या मुलीला दुचाकीवरून शाळेत घेऊन निघालेल्या आईचे दुचाकीवरील स्पीड ब्रेकरवर नियंत्रण सुटले. गाडीवरून पडलेल्या चिमुकलीच्या डोक्यावरून पाठीमागून येणाऱ्या केएमटी बसचे चाक गेल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला.संस्कृती रत्नदीप खरात (वय ४, रा. फोर्ड कॉर्नर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर) असे मृत मुलीचे नाव आहे. सानेगुरूजी वसाहत येथील केएमटीच्या बसस्टॉपजवळ आज बुधवारी दि. 20 रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला.
स्नेहा खरात बुधवारी सकाळी जिवबानाना पार्क येथील आपल्या माहेरच्या घरांतून मुलीला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून सासरवाडी येथील फोर्ड कॉर्नर येथे निघाल्या होत्या. यावेळी साने गुरुजी परिसरात बस स्टॉपवर थांबलेल्या केएमटीच्या बसला ओव्हरटेक करताना स्पीड ब्रेकरवर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यावेळी मुलगी दुचाकीवरून डाव्या बाजूला खाली पडली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या बसचे चाक मुलीच्या डोक्यावरून गेले, तर स्नेहा या दुचाकीसह उजव्या बाजूला पडल्या. या अपघातात संस्कृतीचा जागीच मृत्यू झाला.सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
संस्कृतीचा अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.