SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे रविवारी १ मार्चला कोल्हापुरात होणार कार्यकर्त्यांच्या रॅलीद्वारे जल्लोषी स्वागतसंवेदनशील, रचनात्मक शिक्षणातूनच सामाजिक समावेशन शक्य: प्रा. रेणू दांडेकरडॉ. डी.वाय.पाटील पॉलीटेक्निकची बॅडमिंटनमध्ये विजेतेपदाची हॅट्ट्रिकस्थानिक साहित्य व लोकसहभागातून घडते संवेदनशील वास्तुरचना : संतोष रामाणेभाषिक घोटाळे टाळण्यासाठी विरामचिन्हांचा वापर अनिवार्य मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यापीठातील परिसंवादात सूरअवैध प्रवासी वाहतूक रोखा.. : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे परिवहन विभागाला निर्देशमेन राजाराममध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात महाराष्ट्राची शान, मराठी आमचा मान!शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिन उपक्रमांचे उद्घाटन; प्राणिशास्त्र अधिविभागात विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसादसंजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये ‘इनो क्वेस्ट २के २६’ नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

जाहिरात

 

भाषिक घोटाळे टाळण्यासाठी विरामचिन्हांचा वापर अनिवार्य मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यापीठातील परिसंवादात सूर

schedule27 Feb 26 person by visibility 125 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : भाषिक घोटाळे आणि उद्भवू शकणारे अप्रयोजित विनोद टाळण्यासाठी विरामचिन्हांचा वापर अनिवार्य आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित विशेष परिसंवादामध्ये उमटला.

शिवाजी विद्यापीठात आज मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर भवनातील मराठी अधिविभाग आज रांगोळ्या आणि सुवासिक फुलांच्या माळांनी सजला. विद्यार्थ्यांनी सर्व अधिविभाग आकर्षक पद्धतीने सजविला. या आनंदाच्या वातावरणात ‘विरामचिन्हांचा वापर आणि महत्त्व’ या विषयावरील परिसंवाद अतिशय उत्तम रंगला. या परिसंवादात विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. अनिल गवळी आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. गिरीष मोरे यांनी सहभाग घेतला. जनसंपर्क अधिकारी तथा विद्यापीठाचे मराठी भाषा अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. गवळी आणि डॉ. मोरे या दोघांनीही आपल्या भाषणात भारतातील विरामचिन्हांच्या उगमाच्या इतिहासापासून ते सद्यस्थितीपर्यंत साद्यंत आढावा घेतला.

डॉ. गवळी म्हणाले, भारतात पूर्वी लेखनापेक्षा पाठांतरावर अधिक भर होता. त्यामुळे पाठांतर आणि उच्चारशास्त्र अधिक प्रमाण मानले जाई. दीर्घ, ऱ्हस्व, आरोह, अवरोह इत्यादींसह पाठांतर केले जाई. त्यामुळे त्यावेळी विरामचिन्हे नसावीत. प्रचलित पद्यपद्धतीला अनुसरून विसर्ग आणि दंड हीच विरामचिन्हे प्रचलित होती. मेजर थॉमस कँडी यांनी १८५०मध्ये स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, उद्गारचिन्ह आणि प्रश्नचिन्ह ही पाच विरामचिन्हे मराठी भाषेला दिली. थॉमस कॅंडी यांनी केवळ मोल्सवर्थच्या मराठी इंग्रजी शब्दकोषाचे निर्मितीकार्य सिद्धीस नेले, इतकेच नव्हे, तर इंग्रजी-मराठी शब्दकोषाची निर्मितीही केली. त्याखेरीज येथील पंतोजींच्या शाळांतून इसापनिती, सिंहासन बत्तिशी या पुस्तकांच्या पलिकडे जाऊन वाचन पाठमाला, भाषांतर पाठमाला इत्यादी पुस्तकांचाही अभ्यासक्रमात समावेश करून शिक्षणाला आधुनिक रुप दिले. विरामचिन्हांच्या वापरांबाबतचे अनेक संकेत कँडी यांनी त्यांच्या पुस्तिकेत दिले आहेत, तथापि, विरामचिन्हे वापरताना प्रचलित व्याकरणाचे नियम लक्षात घ्यायला हवेत, अन्यथा घोटाळे होण्याची शक्यता वाढेल.

डॉ. गिरीष मोरे म्हणाले, वक्त्याच्या बोलण्यात स्वर आणि लय या दोहोंना महत्त्व आहे. बोलण्यातून विरामचिन्हे व्यक्त होतात, तर लेखनातून दृश्यरुपात प्रकट होतात. विरामचिन्हे म्हणजे शिस्तीची काटेकोर लेखनसंहिता होय. आपल्या देशात मौखिक परंपरेतून आलेले साहित्य ऐकण्यात येत असे, पण वाचनात फारसे येत नसे. त्यामुळे विरामचिन्हांऐवजी काही बिघडत नसे. आजच्या काळात मात्र विरामचिन्हांऐवजी निश्चित बिघडू शकते. विरामचिन्हांमुळे वाक्याचा नेमका अर्थ स्पष्ट होऊन वाचन सुलभ होते. अर्थस्पष्टतेसाठी वाचकाची दमछाक टाळण्यासाठी विरामचिन्हे आवश्यक आहेत. विरामचिन्हे ही अर्थनिर्णयाची साधना होत. सर्वच लेखकांनी त्यांचा वापर करावा. कवी आणि ललितलेखक यांना त्या बाबतीत थोडी सवलत घेण्याची संधी असते. संशोधकांनी मात्र विरामचिन्हांचा काटेकोर वापर केलाच पाहिजे कारण संशोधनात त्यांच्याकडून अचून विधानांची अपेक्षा असते. ती अपेक्षा विरामचिन्हांमुळेच तडीस जाते. संदर्भनिर्देशाच्या विविध पद्धती यादेखील केवळ विरामचिन्ह वापरातील फरकामुळे निर्माण झालेल्या दिसतात. केवळ अवतरणचिन्ह नसेल तरी सुद्धा वाङ्मयचौर्य ठरू शकते, इतके संशोधनात त्याचे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, मेजर कँडी यांच्यासारख्या अनेक ब्रिटीश अधिकाऱ्यांनी मराठी भाषा व संस्कृतीची मनोभावे सेवा केली. विरामचिन्हे ही त्यांची अमूल्य देणगी होय. बोलण्या-लिहीण्यात विरामचिन्हांच्या वापराअभावी अराजक निर्माण होऊ शकते. बा.सी मर्ढेकर, विलास सारंग, र.कृ. जोशी यांच्या कवितांत विरामचिन्हांचा ठाशीव वापर दिसून येतो. विरामचिन्हे ही भाषेत वाहतूक नियंत्रण यंत्रणेप्रमाणे काम करतात. नियम पाळले नाहीत तर वाक्यांचे अपघात होण्याची मोठी शक्यता असते.

सुरवातीला मृण्मयी पांचाळ या विद्यार्थिनीने मराठी भाषा गौरव गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन आणि विक्रीचा स्टॉलही मांडण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांचा मराठी भाषेचे विविध पैलू उलगडून दाखविणारा विशेष गुणदर्शन कार्यक्रमही सादर झाला. डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. तर अमोल देशमुख यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes