राधानगरी तालुक्यात पत्नीचा कौटुंबिक वादातून गळा दाबून खून; पतीस अटक
schedule17 Dec 24 person by visibility 301 categoryगुन्हे
कोल्हापूर : चाफोडी तारळे (ता. राधानगरी) येथे कौटुंबिक वादातून मंगल पांडुरंग चरापले (वय ४२) यांचा पती पांडुरंग ज्ञानू चरापले (वय ४८) याने गळा आवळून, मारहाण करून खून केला. ही घटना सोमवारी (दि. १६) सायंकाळी पाचच्या सुमारास चाफोडी येथे घडली. याबाबत राधानगरी पोलिसांनी संशयित पांडुरंग चापले यास अटक केली आहे.
चाफोडी येथे शेती करून चरापले कुटुंब उदरनिर्वाह करते. पांडुरंग आणि मंगल यांच्यात नेहमीच किरकोळ कारणावरून वादाचे प्रसंग उद्भवत होते. सोमवारी सायंकाळी दोघेच घरी असताना त्यांच्यात वाद झाला. या वादातून पांडुरंग याने पत्नीचा गळा आवळून भिंतीवर डोके आपटले. या घटनेत मंगल गंभीर जखमी झाल्या. शेजाऱ्यांनी मंगल यांना गावातील रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
दरम्यान, घटनेनंतर पांडुरंग याने पत्नीला बाहेरच्या खोलीत आणून ठेवले आणि ती माळ्यावरून पडल्याचे सांगितले. मात्र, गळा दाबल्याचे व्रण पाहून नातेवाइकांनी विचारणा करताच त्याने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
चरापले दाम्पत्यास एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी इंजिनिअर असून, ती सध्या पुणे येथे एका खासगी कंपनीत नोकरी करते, तर मुलगा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.