डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे ‘अन्वेषण’ स्पर्धेत देदीप्यमान यश
schedule22 Jan 26 person by visibility 57 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या (एआययु) वतीने आयोजित अन्वेषण 2025-26 या संशोधन स्पर्धेत पश्चिम विभागामध्ये डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश संपादन केले आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आंतरविद्याशाखा विभागात प्रथम तर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागात द्वितीय क्रमांक पटकावला.
गुजरातमधील वल्लभ विद्यानगर येथे सरदार पटेल विद्यापीठात अन्वेषण 2025-26 – विद्यार्थी संशोधन अधिवेशन (वेस्ट झोन) स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये आंतरविद्याशाखा विभागात विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थिनी सुस्मिता पाटील आणि मयुरी घाटगे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थिनींना डॉ. अर्पिता पांडे तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या विभागात हर्षदा लोखंडे आणि प्रिया वाडकर यांनी उत्कृष्ट संशोधन सादरीकरण करत द्वितीय क्रमांक मिळवला. या विद्यार्थिनींना डॉ. मेघनाद जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.
सरदार पटेल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. निरंजन पटेल, एआययु संशोधन संचालक डॉ. अमरेंद्र पाणी, ‘अन्वेषण’चे समन्वयक डॉ. अरुण आनंद, डॉ. आर. व्ही. उपाध्याय यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या विद्यार्थांना सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत १२५ हून अधिक संशोधन प्रकल्पांचे सहा विभागात सादरीकरण झाले. डॉ. आश्विनी काळे या विद्यापीठाच्यावतीने समन्वयक म्हणून सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत निवड झालेले विद्यार्थी फेब्रुवारी महिन्यात हिमाचल प्रदेश येथील शुलानी युनिव्हर्सिटी, सोनपत येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सादरीकरण करणार आहेत.
या स्पर्धेत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश अतिशय कौतुकास्पद आहे. विद्यापीठाच्या संशोधन कार्याचे, गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाचे आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे हे प्रतीक असल्याचे गौरवोद्गार काढत कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र- कुलपती ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर डॉ. पी. एस. पाटील, अधिष्ठाता डॉ. सी. डी. लोखंडे यांनी अभिनंदन केले आहे.