कोल्हापूर - कदमवाडी येथील संस्कार शिक्षण मंडळ संचलित सुसंस्कार हायस्कूल मधील शिक्षक संजय सुतार (रा. वरणगे पाडळी) यांच्यावर शाळेच्या आवारातच माजी विद्यार्थ्याने कोयत्याने खुनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
या शाळेत संजय सुतार गेली 25 वर्षे अध्यापनाचे काम करतात. सोमवारी (२६ डिसेंबर) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दोन व्यक्तींनी सुतार यांना शाळेच्या बाहेर बोलावून घेतले. त्यांची दुचाकी पडली होती. शिक्षक सुतार हे दुचाकी उचलत असताना त्यांच्यावर कोयत्याने वार झाले. एक वार मानेवर बसलेला आहे. शाळेमध्ये आपल्या भावाला शिक्षकांनी मारलेला राग मनामध्ये धरून मोठ्या भावाने त्याच्या मित्रासह शाळेमध्ये येऊन हल्ला केल्याचे समजते. शाळेमध्ये शिक्षकावरती झालेला हा हल्ला चिंताजनक व निषेधार्थ आहे. या जखमी शिक्षकाला परिसरातील गॅरेज चालक व रिक्षा चालकाने तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत.
दरम्यान, शाळेच्या परिसरात विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी गर्दी केली होती. शाहुपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांकडून फरार हल्लेखोराचा तपास सुरु आहे.