संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याचे मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेत दैदिप्यमान यश
schedule29 Jan 26 person by visibility 108 categoryक्रीडा
कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या धिरज प्रभुनाथ होळकुंदे याने “राष्ट्रीय स्तरावर संस्थेचे नाव उज्वल केले आहे. ‘साउथ आशिया बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मिस्टर इंडिया बॉडी बिल्डिंग स्पर्धा’ जानेवारी २०२६ रोजी बंगळुरू, कर्नाटक येथे पार पडली. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून १५० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा १८५ सें.मी. व त्यापेक्षा अधिक उंचीच्या गटात घेण्यात आली असून, अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत धीरज होळकुंदे याने उत्कृष्ट सादरीकरण करत द्वितीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल त्याला ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
या यशाबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना धिरज होळकुंदे म्हणाला की, “संजय घोडावत इन्स्टिट्यूट मधील अत्याधुनिक जिम सुविधा, तसेच जिममधील मार्गदर्शक सचिन बागडी यांचे मोलाचे मार्गदर्शन मला सतत प्रेरणा देत राहिले. याशिवाय माझे आई-वडील आणि मित्रपरिवार यांचे अमूल्य सहकार्य व पाठबळ यामुळेच हे यश मिळवणे शक्य झाले.”
धिरज होळकुंदे यांच्या या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले तसेच इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, विभाग प्रमुख प्रा. वंदना शहा, क्रीडा समन्वयक प्रा. संदीप पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संजय घोडावत इन्स्टिट्यूट सदैव प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.