प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभारास जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना उपस्थित राहण्यासाठी आवाहन
schedule23 Jan 26 person by visibility 52 categoryसामाजिक
कोल्हापूर: २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी दोन हजार विद्यार्थ्यांची संगीत कवायत आणि उषाराजे हायस्कूलचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आलेला जागर अंबाबाईचा हा कार्यक्रम मुख्य समारंभाचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत. मुख्य समारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार असून या सोहळ्यास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व नागरिकांना उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले आहे
दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी मुख्य समारंभ शाहू स्टेडियम येथे आयोजित केला जातो. मात्र यावर्षी प्रजासत्ताक दिन समारंभ पोलिस परेड ग्राउंड, कसबा बावडा येथे आयोजित करण्यात आला आहे. शाहू स्टेडियम येथे नव्याने फुटबॉलसाठी गवताची लागवड करण्यात आली आहे. या गवताची वाढ पूर्णपणे न झाल्याने प्रशासनाने जागेत बदल केला आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी, पोलीस गृह विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शाहू स्टेडियम व्यवस्थापक यांनी पाहणी करून जागेत बदल सुचविला.
तसेच त्या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम, संचलन, वाहनांची येजा इत्यादी करणे शक्य होणार नसल्या कारणाने, यावर्षीचा प्रजासत्ताक दिन समारंभ पोलिस परेड ग्राउंड, कसबा बावडा येथे आयोजित करण्यात आला आहे. या बदलाची दखल घेऊन सर्व नागरिकांनी २६ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ वा. पोलिस परेड ग्राउंड, कोल्हापूर येथे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे