▪️आठवड्यातील ३ दिवस वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय
कोल्हापूर : हुबळी ते पुणे या मार्गावर नव्याने सुरू होणार्या वंदे भारत एक्सप्रेसला, कोल्हापूरचा थांबा देण्यात आला होता. पण त्यामुळे काही नवे वाद निर्माण झाले होते. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांच्यासह कोल्हापुरातील अन्य काही लोकप्रतिनिधींनी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधून, कोल्हापूरसाठी स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेस देण्याची मागणी केली. त्यानुसार आता आठवड्यातील तीन दिवस, कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर या मार्गावर स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. १६ सप्टेंबर पासून, कोल्हापूर ते पुणे या मार्गावर नवी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल, अशी माहिती खासदार महाडिक यांनी दिली आहे.
हुबळी ते पुणे या मार्गावर १५ सप्टेंबरपासून नवी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. हीच गाडी मिरजेहून कोल्हापूरला येईल आणि कोल्हापुरातील प्रवाशांना घेऊन पुन्हा मिरज मार्गे पुढे जाईल, असे नियोजन करण्यात आले होते. पण या प्रस्तावाला मिरज आणि कर्नाटक मधील अनेक प्रवाशांनी विरोध दर्शवला. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधून, कोल्हापूर ते पुणे या मार्गावर स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, अशी आग्रही मागणी केली. त्यानुसार येत्या १६ सप्टेंबर पासून, आठवड्यातील तीन दिवस, कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावर, वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. सोमवार, गुरुवार आणि शनिवारी सकाळी सव्वा आठ वाजता, कोल्हापुरातून वंदे भारत एक्सप्रेस सुटेल आणि दुपारी दीड वाजता पुण्यात पोहोचेल. तर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी दुपारी सव्वा दोन वाजता, पुण्यातून वंदे भारत एक्सप्रेस सुटेल आणि सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी ही गाडी कोल्हापुरात येईल.
मिरज - सांगली - किर्लोस्करवाडी- कराड आणि सातारा या स्थानकांवर ही नवी वंदे भारत एक्सप्रेस थांबणार आहे. त्यामुळे प्रदीर्घ काळापासून कोल्हापूरकरांची असलेली मागणी पूर्णत्वास आली आहे. लवकरच कोल्हापूर ते मुंबई या मार्गावरही वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल, असे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले आहे.