कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी इंद्रजित बोंद्रे
schedule27 Jan 26 person by visibility 425 categoryराजकीय
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी नूतन नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांची मंगळवारी सर्वानुमते निवड करण्यात आली. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अर्हता नियम १९८७ मधील नियम तीन नुसार काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांच्या गटाची नोंदणी करण्यात आली. यात काँग्रेसच्या गटनेतेपदी इंद्रजित बोंद्रे यांची एकमताने निवड केली. विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, सहआयुक्त चंद्रकांत खोसे व उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत गटाची नोंदणी करण्यात आली. बोंद्रे हे प्रभाग ८ मधून विजयी झाले असून महापालिकेच्या राजकारणाचा त्यांना पुर्वानुभव आहे. आक्रमक अन अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. आई शोभा बोंद्रे यांनी याआधी महापौरपद भूषवले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन काँग्रेसने त्यांचही गटनेतेपदी निवड केली आहे.
खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक ३४ नगरसेवक निवडूण आले आहेत. सत्तेपर्यंत जाण्यासाठी त्यांना काही जागा कमी पडल्या असल्या तरी महापालिकेत सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला मान मिळाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात सक्षम विरोधी पक्ष म्हणून भूमिका निभावण्याठी काँग्रेसने आक्रमक व तरुण चेहऱ्याला बोंद्रे यांच्या रुपाने संधी दिल्याचे मानले जाते.
यावेळी राजेश लाटकर संजय मोहिते अर्जून माने दुर्वास कदम प्रतापसिंह जाधव सरकार अमर समर्थ सुभाष बुचडे विनायक कारंडे विशाल चव्हाण जयश्री जाधव स्वाती यवलुजे रुग्वेदा माने रुपाली पोवार दिपाली घाटगे पुष्पा नरुटे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
📌खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, आ जयंत आसगावकर, मालोजीराजे छत्रपति, ऋतुराज पाटील, यांनी माझ्यावर विश्वास दाखवून माझी महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदी केलेली निवड मी माझ्या कामातून सार्थकी लावेल. कोल्हापूरच्या विकासासाठी आम्ही प्रशासन व सत्ताधाऱ्यांना नक्की सहकार्य करु. पण जिथे चुकीचे प्रकार घडतील तेथे मात्र, कडाडून विरोध राहील. सर्वसामान्य कोल्हापुरकरांना मुलभूत सुविधा देण्यासाठी आमचा आवाज सदैव बुलंद राहील. त्यासाठी सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही भूमिका पार पाडू.
इंद्रजित बोंद्रे, गटनेता, काँग्रेस, कोल्हापूर महापालिका.