तरुणाईने योग्य मार्गाने माहिती मिळवल्यास एचआयव्ही पासून दूर राहणे शक्य : सिने कलाकार उमेश बोळके
schedule01 Dec 25 person by visibility 34 categoryराज्य
कोल्हापूर : समाजामध्ये जनजागृती घडवून आणणे, तरुणांपर्यंत योग्य माहिती पोहचविणे हे माध्यमांचे काम आहे. तरुणांनी शास्त्रीय माहिती आत्मसात केल्यास एच.आय.व्ही. पासून दूर राहता येईल असे प्रतिपादन प्रसिद्ध सिने कलाकार उमेश बोळके यांनी केले.
जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्यावतीने १ डिसेंबर जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने सीपीआर हॉस्पिटलच्या प्रांगणातून आयोजित करण्यात आलेल्या प्रभात फेरीच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रशांत वाडीकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .सरिता थोरात, प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. योगेश साळे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षला वेदक, HIV जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर,मेडिसिन विभाग प्रमुख डॉ.अनिता परितेकर, बालरोग विभाग प्रमुख डॉ.संगीता कुंभोजकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
बोळके म्हणाले,सध्याच्या मोबाईलच्या युगात तरुण पिढीची पावले गैरमार्गाकडे जाण्याची शक्यता वाढत आहे.शिकत असताना कोणती गोष्ट आत्मसात करावी व कोणती गोष्ट दुर्लक्षित करावी हे तरुणांनी आत्मसात करणे गरजेचे असून यासाठी संकोच न बाळगता शास्त्रीय माहिती घेणे, तसेच करियरवर लक्ष केंद्रीत करणे व चांगले छंद बाळगणे गरजेचे आहे.
तर एच.आय.व्ही.ला हद्दपार करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा.असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रशांत वाडीकर यांनी केले.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी प्रास्ताविकामध्ये जिल्ह्यातील एच.आय.व्ही. बाबत सद्यस्थिती सांगून,एड्स नियंत्रणामध्ये तरुणाईचा सहभाग सर्वात महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
या प्रसंगी इंटेन्सिफाइड आय.ई.सी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सर्व एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांचा तसेच एआरटी केंद्र ग्रीन झोनमध्ये आल्याबद्दल आय. जी.जी.एच.हॉस्पिटल (एआरटी सेंटर) इचलकरंजी व लोटस एआरटी सेंटर कोल्हापूर यांचा मान्यवर अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला.तसेच फ्लॅश मॉब सादरीकरण उत्कृष्टरित्या सादर केल्याबद्दल एन.आय.टी कॉलेज ( कोल्हापूर ) यांनाही गौरवण्यात आले.
यावेळी दंतचिकित्सक डॉ.कुलकर्णी, क्लस्टर प्रोग्रॅम ऑफिसर रमेश वर्धन,वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.ऋतुजा कदम,प्राचार्य श्रीमती शिल्पा घाटगे, पाठ्य निर्देशिका शारदा वाणी,मकरंद चौधरी विनायक देसाई, कपिल मुळे, संदीप पाटील, दीपक सावंत,संजय गायकवाड , अभिजीत रोटे,मनीषा जाधव,पल्लवी देशपांडे , यांच्यासह शहरातील विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक,विद्यार्थी,एड्स नियंत्रण कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनायक देसाई यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे यांनी केले.